संचारी : केल्याने होत आहे रे !असेच जून चे दिवस असतील .आई लोणच्याची तयारी करते आहे.
एकसारख्या कैरीच्या फोडी करून मग ते मीठ तिखट आणि मसाला लावणे,
मग मोहरीचे तेल गरम करून थंड झाल्यावर त्यात टाकणे,
चिनीमातीच्या भांड्यात कापडाचे टोपडे  बांधून त्यात ते मुरवणे,

 

किती निगुतीने ती करायची हे सगळे . आम्हाला कुणाला हात लावू द्यायची नाही , एक अक्खी दुपार तिची जायची ह्या सगळ्यात , पुन्हा आणि हे सगळे आमच्यासाठीच , आणि लोणचे एकावेळी प्रत्येकजण खातो किती तर अगदी तोंडी लावण्यापुरते . तर ह्या लोणच्याच्या वर्षभराच्या बेगमीसाठी किती खपायची माझी आई. एकंदरच स्वयंपाक किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी किती कष्ट वेळ जातो पण ती हे अगदी आनंदाने करायची. अजूनही करते , वय वर्षे ७५ तरी,कारण स्वयंपाक हि तिची मनापासूनची आवड आहे , Passion आहे .

 

एकदा असाच मी लहानपणी तिला प्रश्न विचारला "मला कधी तुझ्यासारखा स्वयंपाक करता येईल? "(त्यावेळी माझे वय असेल ११.आणि आईच्या हातच्या  पदार्थांची सगळे तारीफ करायचे ते बघून मला त्या कौतुकाची भुरळ पडली होती )
बराच वेळ शांतता. मग मी परत विचारले "सांग ना ? कधी? "

 

" आत्ता कुठे तू मला जरा जरा स्वयंपाकात मदत करायला लागली आहेस ? अजून खूs s प वेळ आहे ? आणि असं उतावीळ होऊन कसे चालेल. आत्ता कुठे सुरवात आहे . किती लवकर शिकणार हे डोक्यातून आधी काढून टाक .. नुसते अन्न शिजवायला काय एका वर्षात शिकशील पण भाज्या कश्या विकत घ्यायच्या , कश्या कापायच्या , प्रत्येक अन्न पदार्थाची शिजण्याची वेळ किती , किती मीठ मसाला तिखट , आपल्या माणसांची आवड , ऋतूप्रमाणे स्वयंपाक , स्वयंपाकातली जीवनसत्वे आणि पौष्टिकता  किती ? कितीतरी गोष्टी आहेत बाई . त्या तुला हळू हळू येतील , जितक्या वेळा करशील तितक्या वेळेला नव्याने कळेल. आणि आज मी सांगते तसे तू करते आहेस , नंतर तुझी आवड निवड असेल . कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावाच लागतो . निसर्गाचा नियम आहे तो. "

 

"आणि अगदी इतकी वर्षे मी स्वयंपाक करते पण कधी कधी माझे नीट लक्ष नसेल किंवा मन थाऱ्यावर नसेल तर माझाही पदार्थ मनासारखा होत नाहीच . कळले का?" मम्मी म्हणाली.
मला खरेच किती कळले त्या वेळेला माहित नाही पण हे तिचे उत्तर मी कधी विसरले नाही. हळू हळू तिच्या हाताखाली मी सगळे रीतसर शिकत गेले , कधी वाहवा मिळवली कधी फसलेल्या क्षणी फजिती पण झाली . पण एक लक्षात आले कि सातत्य हवे. पुन्हा पुन्हा करत राहिले पाहिजे.नवीन नवीन प्रयोग त्यातूनच सुचत जातात

 

अर्थात तुम्ही म्हणत असाल हे काय आजच्या २ minutes, फ्रोजन आणि इन्स्टंट च्या जमान्यात मी हे पुराण सांगत बसले आहे. सगळी साधन सामग्री काय अगदी पदार्थ फक्त गरम पाणी घालून थोडा वेळ ठेवून खायचे दिवस आहेत , ते तर सोडाच सरळ फोन करून घरपोच पदार्थ मिळतात हवे ते आणि मी काय हे निवडा – कापा- फोडण्या वगैरे सांगत बसले आहे . आता सगळा कसा इन्स्टंट चा जमाना आहे . कुणाला इथे वेळ आहे हे सगळे सोपस्कार करायला ? . ती एक टीव्ही वर जाहिरात येते ना " दोन मिनिटात आईसारखा उपमा तयार " ( ती आईपण ढगातून येते तिथे. वाह !  ) सगळ्यांच्या घरात एकसारखाच उपमा ??? आईसारखा??

 

 

तीच तर मेख आहे. हेच तर सांगायचे आहे कि स्वयंपाक असो कि संगीत असो कि खेळ असो . कुठल्याही गोष्टीत सातत्य (persistence ) , सराव ( Practice  ) आणि सहनशीलता ( Patience ) ह्या तीन गुणांची प्राथमिक आवश्यकता आहे . त्या शिवाय अशक्य आहे कुठल्याही गोष्टीत प्राविण्य मिळवणे. आज ह्या क्षेत्रात मी अनेक वर्षे आहे आणि मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो कि -किती वेळ लागेल मला शिकायला ?

 

असे अजून काही प्रश्न आहेत जसे कि

 

"चार महिन्यात मला किती येईल ? "

 

"तीन महिन्यात मला अमुक अमुक गाणे गायचे आहे , ते होईल का ?"

 

"दोन महिन्यानंतर माझ्या भावाच्या लग्नात ना माझ्या मुलाला गायचे आहे हनी सिंग चे गाणे , तुम्ही शिकवाल का ?"

 

"दोन वर्षं ???? एवढा वेळ ? अहो पण मला फलाण्या चॅनेल वरच्या ढलाण्या  कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे आत्ता ३ महिन्यात ? "

 

आणि हे सगळे आधी अजिबात शिकलेले नसतात, गात असतात पण त्यांना प्रचंड इच्छा असते प्रसिद्धी मिळवण्याची आणि ती त्यांना लवकरात लवकर साध्य करून घ्यायची असते. अश्यावेळी मला माझ्या आईच्या ह्या उत्तराची खूपच मदत होते.

 

चित्रपटातले गाणे ऐकून , किंवा कुठल्यातरी कार्यक्रमात एखाद्या गिटार वादकाला बघून inspired होऊन हीं मंडळी संगीत शिकायच्या भावनेने क्लास पर्यंत पोचतात , क्लास चालूही होतो पण तेच तेच रोज करण्याचा लगेच कंटाळा यायला लागतो . कधी एकदा गाणी गाता येतील किंवा वाजवता येतील हीच बेचैनी असते. त्या सर्व नवीन होतकरू आणि अगदी नवीन नवीन संगीत शिकणाऱ्यांना माझे अगदी नम्र सांगणे आहे कि संगीत शिकायचे असल्यास तुमच्या गुरुवर श्रद्धा ठेवा , परत परत प्रॅक्टिस करण्याचा कंटाळा करून नका ,चांगले  संगीत ऐका (चांगले संगीत ऐकणे हा एक स्वतंत्र विषय आहे लिहिण्याचा , लवकरच लिहीन मी त्यावर ) , आपण जे वाजवतो आहोत किंवा गात आहोत ते रेकॉर्ड करून ऐका . सराव करत राहा. रोज तेच तेच करायची शिस्त लावून घ्या.
संगीत शिकणे हि एक प्रकारे muscle memory तयार करणे आहे . तुमचा मेंदू( कान हे त्याचे माध्यम ) , हात , पाय ह्या सगळ्या स्नायूंना  वळण लावणे आहे . एकदा का त्यांना शिस्त लागली कि मग तुम्ही कुठलेही गाणे गाऊ किंवा वाजवू शकता . पण ह्यासाठी प्रयत्न हे तुम्ही केले पाहिजेत. तुमच्यासाठी कुणीही हे करू शकणार नाही .

 

अर्थात सगळेच असे असतात असे नाही. प्रचंड मेहनत घेणारी लहान लहान मुले बघून मला कधी कधी स्वतःची लाज वाटते. किती वेळा मी अनेक कारणे देऊन रियाझ चुकवला आहे. अनेक विशीतली मुले मी ह्या क्षेत्रात बघते आहे ज्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. रोजचा सराव किंवा रियाझ ज्यांचा  कधीच चुकत नाही तेच आणि फक्त तेच यशस्वी होतात हेच सत्य आहे.

 

केल्याने होत आहे रे …… आधी केलेची पाहिजे.

 

ता. क. बऱ्याच दिवसापासून हि जी हनी सिंग वगैरे तत्सम मंडळी आहेत ( त्यात आता नवीन बादशहा , रफ्तार वगैरे आधीपासूनच ? प्रसिद्ध मंडळींची भर पडली आहे ) त्यांना एकदा भेटून त्यांना जाणून घ्यावे म्हणते , तुम्हाला काय वाटते जाऊ कि नको जाऊ?

This article has been contributed by Shruti Jakati, Principal at Muziclub.