संचारी : The Music Wanderer
नमस्कार !
मी श्रुती जकाती . बऱ्याच दिवसांपासून Muziclub च्या ब्लॉग वर लिहायचे मनात होते . सुरुवातीला इंग्लिश मध्ये लिहायचा प्रयत्न केला पण मला माझे लिखाण पटलेच नाही . खूप कृत्रिम वाटले मला ते . मी कितीही फाड फाड इंग्लिश बोलत असले तरी माझे पाय जमिनीवरच. मी मराठी माध्यम शाळेत शिकल्याने आपसूक मराठीतच विचार करते. इंग्रजीची शब्दसंपत्ती फारच कमी त्यामुळे बोलण्यात वेळ मारून नेते पण लिहायचे म्हटले तर माझी माय मराठीच .
आणि मराठीत लिहिले तर वाचणार कोण? हा पहिला प्रश्न.
आजकाल संगीत वर्गात सुद्धा सगळे सरसकट इंग्लिश मध्ये गाण्याचे शब्द लिहून घेतात. पोटात कसेतरी होते माझ्या कि अरे आपली राष्ट्रभाषा हिंदी येत नाही तुम्हाला धड लिहायला? मराठी तर फार दूरची गोष्ट आहे . आणि ते असे हिंदी /मराठी शब्द इंग्लिश मध्ये लिहून उच्चारांचे पार कडबोळे होते ते वेगळेच आणि संगीत शिक्षकाला पुन्हा त्यावर वेगळी मेहनत घ्यावी लागते. शब्दांचे उच्चार तर विचारू नका ? परवा मी ऐकले कि कुठल्यातरी FM रेडिओ वरची मुलगी "गार वारे कॉलेज " काsर्वे रोड असे काहीतरी म्हणत होती . म्हणजे हि अशी आजची परिस्थिती तेव्हा प्रश्न असा होता कि मी मराठीत लिहावे कि नाही ? पण सगळे म्हणाले तुम्ही लिहा मराठीत थोडे वेगळेपण येईल.(आता हे म्हणणाऱ्यांना सुद्धा मराठी वाचता येत नाही त्यामुळे किती वेगळेपणा मी ह्या ब्लॉग वर आणते आहे हे त्यांनाही माहित नाही , ते फक्त तुमच्या माझ्यात.)
हे झाले पण आता दुसरा प्रश्न. तो म्हणजे काय लिहायचे . संगीत ह्या विषयावरच पण मी काही कोणी थोर विचारवंत अथवा संगीतात Ph.D नाही . मी एक सामान्य कलाकार. तर मी आपले ठरवले आहे कि मला जे वाटते संगीताबद्दल , माझे अनुभव, माझे संगीत शिक्षण आणि सध्याच्या समाजातल्या घडामोडी अश्या अनुषंगाने मी मनस्वी लेखन करणार. मी फार शास्त्रीय विश्लेषण , तांत्रिक ज्ञान देणाऱ्यातली नाही. माझ्यासाठी गाणे अथवा संगीत हे प्रथम भावना आणि मग तंत्र असेच आहे. शब्द तर फार फार महत्वाचे आहेत माझ्यासाठी.
मी कधीपासून गायला लागले असे कुणी विचारले कि नीट सांगता येणार नाही खरे तर माझ्या बाबांच्याकडचे सगळे नातेवाइक गातात. अगदी सगळे , त्यामुळे मी तशी खूप लहान म्हणजे अगदी दोन तीन वर्षाची असल्यापासून म्हणजे बोलायला लागल्यापासून गात असणार. (माझ्या बाबांना मी अण्णा म्हणायचे.)
"तू जो मेरे सूर मे सूर मिला ले" हे चितचोर मधले गाणे आणि "मेरे नैना सावन भादो" हि दोन गाणी त्यांनी शिकवल्याचे नीट आठवते . अण्णांची दोन गाणी प्रामुख्याने आठवतात ती म्हणजे "जैसे सुरज कि गर्मी से जलते हुए तन को मिल जाये तरुवर की छाया" आणि "मोको कहाँ ढूंढें रे बन्दे मैं तो तेरे पास रे "हि गाणी अण्णा गायचे आणि मी पण त्यात एखादे कडवे म्हणायचे ,अण्णा इतके समरसून गायचे कि तेव्हा अंगावर काटा यायचा त्या वयातहि . ह्या गाण्यांचा अर्थही न कळणारे वय होते ते.
स्वरांचे वेड हे वारसा हक्कानेच माझ्याकडे आले आहे ह्यात काही शंका नाही पण गाण्यांच्या शब्दांचे आणि त्यातील भावनांचे संस्कार माझ्यावर माझ्या अण्णांनीच केले. ते कसे केले त्यांनी? हे आठवत नाही पण खूप लहान वयात मी गाण्याशी एकरूप व्हायला शिकले. खर्या अर्थाने समर्पण शिकले. आजही गाण्याचा अर्थ मनाला भिडला कि मग हि गाणी म्हणताना शब्द आठवावे लागत नाहीत ते सहज येतात ,गाणे गावे लागत नाही ते सहज येते आणि माझे बनून जाते ते. मी शरण जाते त्या शब्द स्वरांना स्वतःला विसरून
भटका हुआ मेरा मन था कोई, मिल न रहा था सहारा
लहरों से लड़ती हुई नाव को जैसे मिल ना रहा था किनारा
उस लडखडाती हुई नाव को जो किसी ने किनारा दिखाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मैं जब से शरण तेरी आया , मेरे राम
ता. क. तुम्हाला माझे लिखाण कसे वाटते आहे ते नक्की कळवा हं . तुमचे अनुभव सुद्धा लिहा. लवकरच भेटू पुन्हा.
क्रमशः
—
This article has been contributed by Shruti Jakati, Principal at Muziclub.