संचारी : घेतला वसा टाकू नका !!!खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .

एक खूप मोठ गाव होत.आणि सगळे खूप आनंदात जगत होते.

प्रत्येकजण आपले काम चोख करायचा. राखणदार,पुजारी,शिक्षक,लोहार,चांभार,सोनार,शिंपी,महार,सगळे सगळे आनंदाने मिळूनमिसळून आपापले महत्व जाणून, राखून जगत होते. शेती जगण्याचे प्रमुख साधन होते आणि मुबलक शेती होती.शेतकरी दिलदार राजा होता.

प्रत्येकाला आपापल्या कामाचा मोबदला धान्य स्वरुपात पोचता व्हायचा.तसा प्रत्येकजण भाजीपाल्यापुरती शेती करायचाच. अडी अडचणीला सगळे एकमेकांची मदत करायचे.पिक कापणीला आले कि सगळे शेतकऱ्याला मदत करायचे.
पिक आले कि आनंद असायचा. तो आनंद मग नाच गाणी गाऊन व्यक्त व्हायचा.

मग त्याहीपलीकडे वाटणारी कृतज्ञता व्यक्त करायला सर्वांनी मिळून ठरवले कि आपण पहिला दिवस गाई बैलांची पूजा करायची -तो दिवस ठरला वसुबारस.

दुसरा दिवस -पाणी आणि धरती ज्यावाचून आपण जगू शकत नाही ,जे आपल धन आहे त्याची पूजा -धनत्रयोदशी.

पुढच्या दिवशी घरातले मोठे , आपला नातेगोतावळा, चुलते लांब गावाचे सगळे आप्त भेटून साजरा करायचा. सगळे मनातले वाईट नष्ट करून. दूर गेलेल्यांना जवळ आणण्यासाठी त्यांना घरी फराळाला बोलावून झालेला आनंद वाटणे -नरक चतुर्दशी.

आलेले धन असेच येत राहावे आणि अखंड वाढावे म्हणून त्या पुढच्या दिवशी त्या लक्ष्मिचि पूजा म्हणजे घराच्या धान्य कोठाराची आणि सोन्या चांदीची पूजा- लक्ष्मीपूजा

नंतर आपल्या सह्चर आणि सहचारिणीचा दिवस- पाडवा.

शेवटी भाऊ बहिण ह्यांचा दिवस म्हणजे भाऊबीज.

हे असे अनेक वर्षे चालू राहिले.हा उत्सव घरोघरी रांगोळ्या, दिवे, संगीत,वेगवेगळे पदार्थ इत्यादींनी साजरा होत होता. आणि अनेक वर्षे असाच होत राहिला.

पुढे चलनात पैसा आला आणि लक्ष्मिपुजनात त्याची प्राणप्रतिष्ठा झाली.

अनेक वर्षात अनेक बदल झाले पण शेते पिकत होती, आनंद वाढतच होता. दीपावलीआता फक्त ह्या गावात नाही तर ती संपूर्ण भारतवर्षात साजरी होऊ लागली .

आता व्यापारी आणि राजकारणी हा एक नवा व्यवसाय गावात आला होता. काही शेतकरी कष्टाला कंटाळून व्यापारी होत होते.

बरेच जण व्यवसाय बदलू लागले होते. दुसर्या गावातून बर्याच गोष्टी गावकर्यांनी आपल्या मानल्या.

सगळे आजूबाजूचे चांगले जे आवडेल ते गावकरी आत्मसात करत होते . सारी पैशाची किमया , माया दाटत होती आणि जोपर्यंत गरजा कमी होत्या सगळे सुखात सारे छान होते.

ह्या सगळ्या बदलातच कधीतरी , एक विचित्र दिसणारा. चपटे नाक,बुटका,पिवळ्या कांतीचा माणूस गावात आला. तो दुसर्या दूर देशातून आलेला व्यापारी होता. त्याच्या गावातले धान्य आणि बर्याच गोष्टी त्याने आणल्या होत्या.

ऐन दीपावलीत तो तिथेच राहिला आणि त्याने तो दीपोत्सव बघितला आणि जाताना म्हणाला तुमचा आनंद अजून वाढवणारी एक गोष्ट माझ्या गावात आहे ती मी नक्की आणीन पुढच्या दीपावलीत. आणि खरेच त्याने शब्द पाळला.

त्याने जी गोष्ट आणली ती आज पर्यंत त्या गावात काय पूर्ण देशात आहे.

ती बनवण्याची कलाही आत्मसात झाली आहे . लहान नाजूक बोटे ते बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घालत आहेत आणि आता तर सध्या अशी परिस्थिती आहे कि गावात आता शेती नावाला उरली आहे.
शेतकरी आत्महत्या करतो आहे कारण पिकच येत नाही आहे.

सगळीकडे प्रदूषणाने हाहाःकार उडाला आहे

पण दीपावली मात्र अजूनही साजरी होते आणि त्या चपट्या नाकाच्या माणसाने आणलेल्या त्या  गोष्टीमुळे , फटाक्यांमुळे प्रचंड प्रदूषण होते . तरीही दीपोत्सव म्हणजे फटाके असेच समीकरण झाले आहे.

सगळे ते विकत आणतात आणि वाजवतात आणि मगच त्यांची दिवाळी साजरी होते.

काही गावकरी खूप चिंतेत आहेत . गाव आता प्रदूषणमुक्त करून पुन्हा हिरवागार करायचा आहे आणि शेतकऱ्याच्या सोबतीने दीपावली साजरी करायची आहे. आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बळीराजाला पुन्हा उभा करायचा त्यांनी हा वसा आता घेतला आहे.

उतू नका मातु नका, घेतला वसा टाकू नका, हि कहाणी अशीच साठा उत्तरा सफल होवो.

तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेछा !!!!! हा दीपोत्सव तुमच्या आयुष्यात प्रकाश , आनंद आणि समृद्धी आणो !!!

विशेष टीप – हा लेख मी ५ वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. नुकत्याच आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आनंद झाला आणि आठवण झाली माझ्या लिखाणाची आणि तुमच्यासमोर मांडला.
कळावे, लोभ असावा.

श्रुती जकाती