संचारी : गणपती बाप्पा मोरया !!! 

गणपती आमच्या घरात पाच दिवस.

म्हणजे मी माझ्या लहानपणीच्या दिवसांबद्दल सांगते आहे. माझे लहानपण पुणे , जबलपूर आणि डोंबिवली इथे गेले . घरात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला साग्र संगीत पूजा नैवेद्य आरती वगेरे हे असे चालायचेच . पण जबलपूर वरून डोंबिवलीला आल्यावर खर्या अर्थाने गणेशोत्सव कळला . चतुर्थीच्या दहा बारा दिवस आधीपासूनच म्हणजे जन्माष्टमी पासूनच डोंबिवलीत जे उत्साहाचे वातावरण असायचे त्याला जगातल्या कुठल्याही उत्साहाची तोड नाही . आजही असते पण त्यावेळी अजून सगळ्याचे बाजारीकरण झाले नव्हते . असायचा तो उत्साह , एक असण्याचा , आणि गंध माणुसकीचा,आपुलकीचा .

 

पहिल्या वर्षी मला हे सगळे नवीन होते . मला सगळ्यांना अशा आनंदात आणि गडबडीत बघून खूप मजा वाटत होती . आम्हा सर्वांना लहान मुलांना पण करायला काहीतरी काम दिले गेले , कोणी आरास करत होते तर कोणी बाजारात जाऊन सामान आणत होते . बायका घरात प्रसादाला रोज काय ठेवायचे हे ठरवण्यात मग्न तर तर मोठे मग पूजेचे समान तयार ठेवण्यात तर आम्ही कोण फुलांच्या माळा करणार कोण वाती वळणार , दुर्वांच्या जुड्या कोण करणार वगेरे ठरवायचो आणि हो आरत्या पाठ करणे हे एक मोठे काम असायचे .

 

गावात जागोजागी छोटे मोठे बाप्पा आपापल्या घरांच्या माणसांची वाट बघत असायचे तर आरासाच्या वस्तूं दुकानात ,हातगाडीवर सजवून ठेवलेल्या असायच्या . बाप्पा येणार येणार म्हणता म्हणता तो दिवस येउन ठेपायाचा . मुख्य दरवाज्याला तोरण माळा चढवल्या जायच्या, दारासमोर रांगोळी काढली जायची . आधीच ठरवून सगळे जण एकमेकांच्या सोयीने आणि साथीनेच बाप्पाला घरी आणायचे. घरगुती गणपती झांजा , घंटी ,ह्याच्या साक्षीने यायचे . त्याची यथासांग गुरुजी द्वारे स्थापना व्हायची . मग हमखास बायकांची चर्चा कि कसे ह्या वर्षी गणपतीचे डोळे फार सुंदर आहेत . उंदीर किती गोड रेखला आहे. किती शांत भाव आहेत बाप्पाच्या चेहऱ्यावर ,पितांबर किती छान रंगवले आहे वगैरे वगैरे . हे सगळे असे भारलेले वातावरण मला खूप आवडले (अजूनही आवडते ) , हे बाप्पा तर फक्त देव नसून जादुगार पण आहेत असे वाटून गेले मला तेव्हां. ते येणार म्हटले कि सगळे आपापले वाद , मतभेद विसरून एकमेकांना धरून त्यांच्या येण्याची तयारी करताना बघून वाटले कि हे बाप्पा वर्षातून किमान दोनदा तरी यायला हवेत .

 

मला स्थापनेच्या आधी ते बाप्पाचे तोंड झाकून ठेवतात तेव्हा सारखा त्याचा चेहरा बघायचीच उत्सुकता असायची . मी नेहमी जरा जास्तच हळद कुंकू घेऊन त्याच्या सोंडेवर सोडायचे . फुले नीट ठेवायच्या नादात बाप्पा कसा गुळगुळीत लागतो हाताला हे अनुभवायचे . आई धपाटा घालायचीच पाठीत . स्थापना झाली कि आरत्या आणि मंत्र पुष्पांजली म्हटली जायची . डोंबिवलीत यायच्या आधी मला फक्त सुखकर्ता दुखहर्ता येत होते. इथे आल्यावर आरत्यांचा विविध चालींचा खजिनाच मिळाला मला . एका वर्षात एकवीस आरत्या म्हणायला लागले मी आणि मंत्र पुष्पांजली हळू हळू शिकले. आमच्या आसपासच्या वाड्यात सगळ्यांकडे आरतीला आम्ही जायचो . केळकर गुरुजींची आरती सुरु झाली कि अख्खा सावरकर रोड त्यांच्या सुरात सूर मिसळून मनातल्या मनात नक्की आरती म्हणत असे . एकदम खडा आणि घोगरा आवाज होता त्यांचा . मंत्र पुष्पांजली म्हणताना "ओम स्वस्ति साम राज्यं स्वाराज्यं ते सार्व भौम सर्वायुषा" पर्यंत ते एका दमात म्हणायचे . माझे सगळे लक्ष ते श्वास कधी घेतात ह्याकडेच लागलेले असायचे . कोणालाच त्यांच्यासारखे एका दमात ते म्हणता यायचे नाही.

 

 

हे तर घरच्या गणपतीचे झाले.सार्वजनिक गणपती उत्सवाचे तर माझ्या सारख्या असंख्य कलाकारांवर न फेडता येणारे उपकार आहेत. डोंबिवलीच्या गणेश मंदिरात गणेशोत्सवातच पहिल्यांदा मी खूप लोकांसमोर गायले. खूप घाबरले होते गायच्याआधी.

माझी मावशी मला गाण्याच्या क्लासला न्यायला आणि सोडायला यायची. तिला मी म्हटले कि मावशी मला खूप भीती वाटते आहे ग , मी गाताना चुकले तर सगळे हसतील न. तिने म्हटले अगं बाप्पा असे होऊच देत नाही. तू चुकली तरी तो ते बरोबर करून टाकेल. त्याला जे आवडत नाही तो ते होऊ देत नाही. तू चुकणारच नाहीस. त्यानंतर कितीतरी वर्षे मी गणपती बाप्पाला पहिले नमन करूनच गायचे . हा त्याच्यावरचा विश्वास माझ्या आत्मविश्वासात कधी बदलला मलाच कळले नाही .

 

घरचे गणपती गेल्यावर आमच्या आया आम्हाला घेऊन कल्याण आणि ठाण्याचे गणपती बघायला घेऊन जायच्या. कल्याणठाण्याच्या सगळ्या आळीतले गणपती बघत बघत दिवस अपुरा पडायचा. भाज्यांचा गणपती , नारळाचा गणपती , कधी भांड्यांचा गणपती तर कधी पुस्तकांचा गणपती.

अफाट अचाट कल्पना ह्या बाप्पाच्या जन्माचे मुळ आणि अनेक सर्जनशील कल्पनांना जन्म देणारा त्याचा हा उत्सव. त्याच्या कथेपासून ते शिवाजी महाराज ते त्या वेळच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करणार्या एखाद्या छोट्या नाटुकली च्या साक्षीने बाप्पा आमच्या मनाचे असंख्य कप्पे उजळत होते. फक्त गायक वादक नर्तक नव्हे तर असंख्य चित्रकार , नेपथ्यकार , नाटककार , खेळाडू , सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी ह्या गणेशोत्सवातच घडले त्या काळी. हि त्या काळच्या गणेशोत्सवाने समाजाला दिलेली ठेव आहे.

पित्रे वाड्यात झालेली हृदय नाथ मंगेशकरांची मेहफिल असो, सी के पी हॉल मधला प्रभा अत्रे , मालिनी ताई यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असो, बोलक्या बाहुल्या , शं.ना. नवरे यांचा कथा कथन कार्यक्रम , रामदास फुटाणे ,यशवंत देव , सुधीर मोघे , शांताराम नांदगावकर, विविध क्षेत्रातलि ध्येयाने पछाडलेली अशी हि नामवंत मंडळीं त्यांचे अंतरंग उलगडणाऱ्या मुलाखती अशा दहा फुटावर बसून याची देही याची डोळा पाहिली , ऐकली आहे आणि मी घडले आहे.

आज जमाना बदलला आहे,आणि हे पूर्वीचे बरेच काही आता राहिले नाही हे मी जाणते पण आजही आपण आपापल्या परीने घरी , सोसायटीत गणपती बसवतो आणि अनेक सार्वजनिक गणपती उत्सवात आजही अनेक नवोदित आणि प्रतिष्ठित कलाकार आपली कला सादर करतात .आजही हे गणेशोत्सवातले भारावलेले वातावरण मला खूप सुखावून जाते .

 

तर अश्या देश , धर्म , जातपात , कर्मकांड , आर्थिक ऐपत ह्या सगळ्या सगळ्याच्या पलीकडे माणसाला माणसाच्या जवळ नेणाऱ्या आणि असंख्य कलाकारांना आत्मविश्वास देणाऱ्या ह्या गणेशोत्सवाला मी धार्मिक नसूनही मानते.

 

तुम्हा सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !!!!

 

This article has been contributed by Shruti Jakati , Principal at Muziclub.