जेथे जातो तेथे तू माझा सांगाती – Sanchari  

प्रवास आणि संगीत , एक अतूट नाते आहे .

मला तर अगदी पाच मिनिटाचे ड्राईव्ह असले तरी गाणे लागतेच. लॉन्ग ड्राईव्ह वर तर हवेच हवे. कुणी मला समजा विचारले कि " अगं हे अमुक अमुक ठिकाणी जायला किती वेळ लागेल? तर मी सांगते "साधारण ५ गाणी आणि तू पोचशील."

खरे तर घर ते Muziclub हे अगदी जेम तेम सात ते दहा मिनिटाचे अंतर आहे पण त्यातही आवडीचे गाणे लागले तर मी जरा गाडी हळू चालवते किंवा थोडा लांबचा रास्ता पकडून जाते . मला कॅसेट आणि सीडी पेक्षा radio जास्त आवडतो. पुढचे गाणे कुठले लागेल हे माहित नसते. अनपेक्षित गाण्यांची मजाच वेगळी.

अर्थात दर वेळी आपल्याला आवडेल असे गाणे लागेलच असे होत नाही . कधी कधी तर सगळ्या चॅनेल वर जाहिराती चालू असतात . पण तरीही मला रेडिओच आवडतो. आणि आवडीचे चॅनेल विविध भारती. त्यातल्या काही कार्यक्रमांचे सुरुवातीचे संगीत ऐकून जुन्या आठवणी जाग्या होतात. किती नाद आणि किती आवाज ह्या आपल्या मेंदूत आपण लहानपणापासून साठवलेले असतात ना !

माझ्या लहानपणी सकाळी येणारा वासुदेव त्याची ती मोरपिसांची टोपी घालून किती सुंदर गायचा. आईने दिलेले त्याच्या झोळीत टाकून ,त्याचा आशीर्वाद घेवून शाळेत जाताना छान वाटायचे.  त्याचे गाणे मनात सारखे घुमत राहायचे .

अमावस्येचा दिवशी किंवा दुसर्या दिवशी "आवस वाढ ताई आवस " म्हणणारी खणाची चोळी घातलेली आणि बांबूच्या बुट्टीत देवांना वेठीला धरलेली बाई आणि ग्रहणाच्या नंतर दे दान सुटे गिराण अशी हाकारत येणारी बाई , कल्हैवाला , सुरीला धार करून देणारा , रद्दीवाला, मातीवाला ह्यांचे हाकारे आणि त्यांच्या त्या खास उच्चारांच्या लकबी सगळे आहे साठवलेले.

दुपारी जेवण झाल्यावर रेडियो वर लोकसंगीत लागायचे आणि त्याची ती सुरुवातीची धून ऐकता ऐकता मला डुलकी लागायची . थोडी जाग थोडी झोप अश्या अवस्थेत खूप सारे नाद ऐकू यायचे .

एकीकडे घरात आई कपडे झटकून वाळत घालताना  त्या काठीचा आवाज, मध्येच कुठेतरी एखादा सुतार पक्षी "टोक टोक" करत झाडाच्या बुंध्याला भोक पाडत असलेला आवाज.

कुणाच्यातरी घरी चालेलेले ते tiles चे ठाकठूक काम ,मध्येच एखादा कुल्फीवाला किंवा बर्फाचा गोळा वाला ओरडत जाणारा कधी भसाडा तर कधी जोरात नक्कल करावीशी वाटणारा आवाज .

जोरजोरात कावळे आणि चिमण्यांशी भांडणारी साळुंकी, मग परत जरा शांत होते कि नाही कि बोवारीणीचा हकारा .

चुकून एखादी लहान मुलाची किंकाळी आणि पुढे रडणे .

कुठेतरी सिलेंडर वाल्याचा जोरदार सिलेंडर आपटल्याचा आवाज .

जगात असूनही नसल्यासारखी मी अर्धवट तंद्रीत हे सगळे आवाज टिपून घ्यायची आणि नुसत्या आसपास ह्या आवाजांच्या अस्तित्वाने मला सुखाची शिरशिरी यायची आणि दुपारी उठून क्लास ला जायचे जिवावर यायचे.

चार साडेचार झाले कि आवाज इतके असायचे कि त्यांचे स्वतंत्र अस्तित्वच विरून जायचे . मग आम्हा मुलांचा खेळतानाचा गोंधळ , भाजीवाल्यांचे हाकारे ,रस्त्यावरची वर्दळ , घरोघरी लागलेले रेडियो आणि ती लोकगीते.

इस्त्रीवाल्याच्या दुकानात जर जास्तच जोरात लावलेला टेप तर कुठे कुकरचे आवाज .

आणि दिवसभर उड्या मारून मारून दमलेल्या आणि संध्याकाळी परतून आलेल्या चिमण्यांनी भरून गेलेल्या झाडाचा आवाज .

दूरवर उडताना आवाज करत अंधार चिरत जाणारी टिटवी आणि मी पण आहे मी पण आहे असे घशातल्या घशात आवाज काढत आपले अस्तित्व जाणवून देणारी पाल  🙂

बरेच आवाज काळाच्या ओघात बदलले तर काही नामशेष झाले , पण कधीतरी दुपारी निवांत झोपले असताना अचानक आमच्या सोसायटीत माळी पालापाचोळ्याला आग लावतो आणि त्या आगीची हलकीच चट चट मला पुन्हा बालपणीच्या तंद्रीत घेवून जाते.

तर मी सांगत होते अनेक आठवणीतल्या आवाजांबद्दल . आज अजूनही विविधभारतीवर हवामहल ह्या कार्यक्रमाची सुरुवातीची धून अजूनही तीच आहे जी ३५ ते ४० वर्षांपूर्वी होती.

मला विविधभारती आवडायचे आणखी एक कारण म्हणजे आजकाल बनणारी गाणी . विविधभारतीवरचे कार्यक्रम हे जास्त करून सुरेल आणि सुंदर गाण्यांचे असतात असे आपले मला वाटते . बाकी सगळ्या एफएम वरही खूप छान असतात गाणी , नाही असे नाही पण तरी शनिवार रविवार अगदी उच्छाद असतो . रेडिओ आहे का डीजे लावला आहे हा संभ्रम पडतो मला.

मुन्नी , शीला, बबली,चीपका ले फेविकॉल से किंवा अगदी आत्ताची बेबी डॉल  ह्या सर्व गाण्यांना माझा आक्षेप आहे किंवा असतो  तो शब्दांसाठी आणि ते जसे चित्रित केले जाते त्या साठी असतो .

सूर हे नेहमीच चांगले असतात , ह्या सर्व गाण्यांमधून हे अश्लील शब्द आणि चित्रीकरण काढून टाकले तर हि सर्व गाणी कुठे न कुठे लोकसंगीतासारखी झिंग आणतात मनाला.

ह्या गाण्यांचा ताल आणि सूर कुणालाही नाचवेल असाच आहे .

पण तरी माझ्यासाठी चांगले शब्द हि माझ्यासाठी गाणे आवडण्यासाठी पहिली आवश्यकता आहे. उगीचच च ला च किंवा र ला र लावून बनवलेली गाणी मला ऐकावीशी वाटत नाही .

एक गमतीशीर आठवण सांगते माझ्या सिक्कीम प्रवासातली.

त्या प्रवासात सगळ्या drivers नि  न चुकता अखिल भारतव्यापी हिमेश रेशमिया ची गाणी वाजवली. अगदी हुक्का बार , fire brigade मंगवा दे तू वगैरे.  प्रत्येक वेळी माझ्या मनात त्या driver ला विचारावे असे आले कि बाबा रे तुला दुसरी गाणी नाही का माहित ? पण माझ्या मैत्रिणीने मला दर वेळी गप्प बसवले .

शेवटच्या दिवशी मात्र सगळे उतरून पुढे गेल्यावर मी मागे थांबून त्याला हा प्रश्न विचारलाच , तो अर्थपूर्ण हसला आणि म्हणाला " मेमसाब आप जो केहते हो वो सही है , लेकिन ये गाने सुनके नींद नही आती और आंखे नाही झपकति ,हमेशा मस्त लगता है " मी निरुत्तर .

परतत असताना मुंबई airport वर रात्री साडेबारा वाजता पुण्याला जाण्यासाठी taxi केली . पाचव्या मिनिटाला हलकट जवानी  सेकंड hand जवानी ला long drive  पे चल म्हणत होती .

driver जमातीची झोप उडवून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवणार्या ह्या सर्व गाण्यांना आणि बाबा हिमेश रेशमियाला माझा साष्टांग नमस्कार

मी अगदी आजही सकाळी "संगीत सरिता" ऐकते .

आणि संध्याकाळी मी  घरी एकटी असते तेव्हा मराठी गाण्यांचा मूड असेल तर सर्वात आधी "हि वाट दूर जाते "पासून "तळव्यावर मेहेंदीचा अजून रंग ओला ", "असा बेभान हा वारा" ते शेवट कधी "हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा" ह्या गाण्यानेच होतो कळत नाही .

आणि हिंदी गाण्यांचा मूड असेल तर सर्वात आधी मी गाणी लावते ती "मिराज-ए-गज़ल" ह्याच अल्बम ची. त्यानंतर येते सीडी "घर इजाजत आणि मासूम "ह्या चित्रपटातल्या गाण्यांची मग शेवट "सजदा" अल्बम मधल्या दर्द से मेरा दामन भर दे ह्या गाण्याने.

मला अभंग किंवा सुफी गाणी , लोकगीते मनापासून भावतात , मी कुणीही हि अशी गाणी म्हणतात ना तेव्हा त्यात गुंगून जाते . कधी हात टाळ्या वाजवायला लागतात कळत नाही मला. मला हि  गाणी इतकी जवळची आणि आश्वासक वाटतात कि मला माझे कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून जगण्यात हि एवढीच एक कृतार्थता आहे असे अगदी मनापासून वाटते.

अगदी नुकतीच मी राजस्थान फिरून आले. तिथे प्रवासात आम्हीच गाणी म्हटली. प्रवासात अंताक्षरी हि अनोळखी माणसातले अंतर दूर करून त्यांना जवळ आणते. ह्याही प्रवासात अंताक्षरीमुळे आपलेपणा आणि एक असल्याची भावना वरचढ ठरली. जैसलमेर इथे लोकसंगीताचा कार्यक्रम असो कि जसवंतथाडा इथे रावणहातथा वर केसरिया बालम वाजवणारा कलाकार असो कि मेहेरनगढ वर आम्ही मराठी आहोत हे कळल्यावर आमच्यासाठी खास " एकविरा आई तू डोंगरावरि " म्हणणारे राजस्थानी गायक असो , संगीत हि अनोळखी लोकांना क्षणात जवळ आणणारी जादू आहे असेच वाटते मला.

मागच्या वर्षी मी लेह लडाख ला जायचे ठरवले १० जुलै ला आणि अगदी दोन दिवस आधी बुर्हान वाणी हे कांड घडले . सगळे म्हणाले नको जाऊस. खूप गोंधळ होता सगळीकडे विमानसेवा रद्द झाली होती . पण मी जायचे ठरवलेच.   हा हि एक अनुभव आयुष्यात घेऊन बघू म्हणून गेलो .

मला आतून माहित होते कि सत्य इतके भयानक नसणार आणि तसेच झाले . आहे त्यापेक्षा दोनशे पटीने बातम्या रंगवल्या जातात हे पटले . टुरिस्ट साठी curfew शिथिल केला गेला होता. रस्त्यावर बायका सुद्धा होत्या.

(आमच्या ड्राइवर ला आमिर ला आम्ही श्रीनगर बघू शकलो नाही म्हणून खूप वाईट वाटले.  त्याने आम्हाला परत बोलावले आहे .) रात्री अडीच वाजता आम्ही काय अनेक जण निघाले लेह ला जायला.

मला अजिबात भीती वगैरे वाटली नाही , उलट सगळ्या प्रसंगातून जाऊनच माणूस सत्य समजू शकतो हे अजून एकदा पटले.

गाडी सुरु झाली . थोडा वेळ त्या शांततेत गाडी चालवत होता आमिर. आमिर माझ्या मुलापेक्षा एक वर्षाने मोठा . २४ वर्षाचा , कदाचित अशाच curfew मध्येच तो जन्माला आला असेल.

मी फक्त त्याला विचारले " आमिर गाणी लावता येतील का रे ? तो म्हणाला हो का नाही . मला वाटले तुम्हाला झोपायचे असेल म्हणून नाही लावले. "

मी म्हटले "नाही आम्ही नाही झोपणार , तू लाव गाणी" त्याने गाणे लावले , जे आज पर्यंत आजवरच्या प्रवासात कधी नाही ऐकले ते त्याने श्रीनगर च्या curfew मध्ये ऐकले.

साँसों की माला पे सिमरु मैं पि का नाम
अपने मन की मैं जानू
और पि के मन की राम

प्रीतम का कुछ दोष नहीं है
प्रीतम है निर्दोष
अपने आप से बाते कर के
हो गयी मैं बदनाम। …..

हे गाणे संत मीराबाईचे आणि गायक नुसरत फतेह अली खान आणि हे काश्मीरच्या वादग्रस्त भूमीवर मी ऐकत होते रात्री २ वाजता . माझा तो ११ दिवसांचा प्रवास अविस्मरणीय झाला.

 

ह्या आयुष्यातल्या प्रवासात किती गाणी ऐकली किंवा अजून ऐकेन माहित नाही पण माझ्या ह्या प्रवासात मला सतत साथ देणाऱ्या गाण्यांनी मला सर्व भाव भावनांनी भरलेल्या माणसागत जगायला शिकवले आहे.


This article has been contributed by Muziclub Principal – Shruti Jakati.