माझी सुलूगिरी …भाग १ 

 

२ डिसेम्बरला मी तुम्हारी सुलु हा चित्रपट बघितला . आणि माझ्या मनात माझ्या आयुष्याचा फ्लॅशबॅक चालू झाला.

चित्रपटाची गोष्ट अशी आहे कि सुलोचना एक मध्यमवर्गीय गृहिणी , बारावी नापास हा एक शिक्का असलेली आणि त्यामुळे घरात दोन मोठ्या जुळ्या बहिणींच्या कर्तृत्वामुळे कायम कमी लेखलेली .

सुलोचनाचा आपला छोटासा साधा संसार असतो. अगदी मित्रासारखा तिच्यावर प्रेम करणारा नवरा आणि एक उपद्व्यापी मुलगा.

सुलूचा सतत काहीतरी करत राहण्याचा आणि धडपडा स्वभाव.

ती एकदा रेडिओ wow वर कुठल्यातरी स्पर्धेत प्रेशर कुकर जिंकते आणि तो आणायला ती तिथे जाते. कुकर घेऊन येताना ती तिथे RJ ची ऑडिशन ची जाहिरात बघते आणि मग सुरु होते तिची कहाणी RJ बनण्याची . त्यात तिला अनंत अडचणी येतात पण ती त्यावर आपल्या परीने उपाय योजून पुढे जाते. एका क्षणी वाटते कि ती हरली , ती नाही करू शकणार पण नाही .तसे होत नाही. अगदी शेवटी पुन्हा तिला नवीन काहीतरी करायची कल्पना सुचते. त्या क्षणी तिच्या डोळ्यात दिसते एक चमक.

विद्या बालन अगदी जगली आहे हि भूमिका. मुळात चित्रपटाची कथा आणि माझ्या आयुष्यात काहीही साम्य नाही परंतु तिचा जो सतत काहीतरी करत राहण्याचा , आहे तसे जमेल तसे आपले घर आणि मूल  सांभाळून ती जी काही धडपड करते ना, त्यात आणि माझ्या स्वभावात खूप साम्य आहे . घरी सुद्धा गप्प बसण्याचा स्वभाव नाही माझा.

 

तर चित्रपट बघताना माझ्या समोर माझे लग्नानंतरचे आयुष्य एकदम इस्टमन कलर ७०mm मध्ये तरळून गेले. रात्री घरी जाताना माझ्या लक्षात आले कि मी किती उद्योग केले आहेत आज पर्यंत . गाण्याव्यतिरिक्त किती क्षेत्रात मी काम केले आहे. आणि मी कशी होते आणि आता जशी आहे, तो सगळा  प्रवास माझ्या मनात फिरू लागला. म्हणून लिहायला बसले. आणि बऱ्याच जणांना माझ्या आधीच्या आयुष्याबद्दल खूप उत्सुकता आहे त्यांनाही कळेल मी नक्की काय काय केले आहे ते.

हे सगळे अनुभव मी तुमच्यासमोर  मांडणार आहे . का ? तर अशी माझ्यासारखी आणि सुलूसारखी असंख्य माणसे आहेत ह्या जगात . त्यांच्या धडपडीची कहाणी मांडून मी हेच सांगणार आहे कि प्रयत्न सोडू नका . कुठलीही संधी दवडू नका. माहित नाही त्यात कुठल्या अनुभवांचा खजिना दडला आहे . शिकण्यासारखे इतके असते आपल्या आसपास पण आपण स्वतःबद्दल काही समज धृढ करून ते गमावतो, आणि अनेक आनंदही गमावून बसतो.

तर माझी सुलूगिरी असे मी मजेशीर नाव दिले आहे ह्याला आणि मला वाटते ह्याचे एकापेक्षा जास्त भाग होणार आहेत. तेव्हा सांभाळून घ्या आणि तुमचे अभिप्राय – अनुभव नक्की कंमेंट्स मध्ये लिहा. मला खूप आवडते जेव्हा मनापासून सगळे लिहितात.

बरे ह्यात मी अश्या बऱ्याच माणसांची नावे घेणार आहेत जी माणसे खूप प्रसिद्ध आहेत , नावाजलेली आहेत. कृपया असा गैरसमज करून घेऊ नये कि माझे सगळ्यांशी खूप जवळचे संबंध आहेत. खूप माणसे भेटली त्यातलीच ती पण.

 

तर सुरुवात करते आहे माझ्या लग्नानंतरची.वय २० पूर्ण.

लग्न झाल्यावर नवऱ्याचा जॉब चेन्नईला असल्याने तिथे ( तेव्हा मद्रास ) गेले. जून मध्ये लग्न झाले आणि आम्ही ऑगस्ट मध्ये मद्रास ला पोचलो. नवीन जागा , नवीन भाषा, नवीन संसार.

घरात अगदी मोजक्याच वस्तू त्यात माझी एक पेटी , तानपुरा. घराला लागणारे सामान आणण्यासाठी बाहेर पडले तर लक्षात आले कि मला तामिळ भाषा येत नाही. आणि आम्ही राहत होतो ती जागा थोडी मद्रासबाहेर असल्याने ते गाव होते.  मद्रास मध्ये तेव्हा इंग्रजी बोलायचे सगळे पण हिंदी मात्र अजिबात बोलायचे नाही. आणि हे तर गाव होते इथे तर इंग्लिश हि नाही .तर मी कशीबशी (मुक्यानेच ) खाणाखुणा करून किराणा सामान खरेदी केले. आणि दुसऱ्या दिवसापासून माझ्या घरमालकिणी कडून तामिळ शिकणे सुरु केले . माझी मातृभाषा कानडी असल्याने मला चांगले जमत होते. तर हा झाला संवाद सुकर होण्याचा मार्ग.

आता मी दिवसभर बसून काय करू ? हा एक मोठा प्रश्न होता. आणि नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. अर्ज करत होतेच. तर मी असे ठरवले कि रोज एक बस पकडून तिच्या शेवटच्या थांब्यापर्यंत जाऊन परत यायचे. आणि खरे सांगते आजही ते सगळे मार्ग लख्ख लक्षात आहेत . त्यामुळे मी interview ला अगदी सहज जाऊ लागले.मोडके तोडके तमिळ आता पक्के होऊ लागले .

माझे CWA मी तिथे परत चालू केले. आणि दोन तीन महिन्यात मला नोकरी पण लागली. बरे हि सगळी दुनियादारी झाली पण एकीकडे माझे गाणे मला गप्प बसू देत नव्हते. असेच कुणाकुणाला विचारून महाराष्ट्र मंडळ पण शोधून काढले. आणि गणपती उत्सवात गाणेही म्हंटले. खूप मैत्र जमा केला . श्री ओझरकर ,गोकुळ देशपांडे आणि शिरीष पुरोहित हे मद्रास चे स्नेही. आजही आम्ही संपर्कात आहोत.

पुढच्या वर्षी तर नाटकात सुद्धा काम केले . " वरचा मजला रिकामा " . धमाल नाटक होते ते . दिवसभर काम करायचे संध्याकाळी नाटकाची प्रॅक्टिस.त्यातच कधीतरी मला ताज कोरोमंडल ह्यांचे गझल गाण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले .

आता ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज नाही झाल्या. एकातून एक एकातून एक माणसे भेटत गेली , आणि मी आलेल्या प्रत्येक संधीला हो म्हणून पुढे गेले. गाणे तर माझे होम ग्राउंड होते पण अभिनय मी फार केलेला नव्हता . कधीतरी शाळेत एखाद्या नाटकात मी काम केले होते. पण मी नाही म्हटलेच नाही.

मला रोजच्या आयुष्यात काहीतरी वेगळे करायला मिळणार होते त्यामुळे ते मी आपलेसे केले.इतरांनी खूप मदत केली. स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांची बहीण तेव्हा मद्रास ला राहायची. त्यांच्याकडे आमच्या तालमी व्हायच्या. त्यांनी आणि कुलकर्णी जोडप्याने खूप माया केली माझ्यावर.

 

एक दीड वर्ष असे मस्त गेले आणि कळले मी आई होणार आहे . .

तरी मी माझे CWA पूर्ण केले अगदी सातव्या महिन्यात त्याची परीक्षा दिली आणि आठव्या महिना लागेपर्यंत मी ताज मध्ये गात होते. तिथला सगळा स्टाफ माझी इतकी काळजी घ्यायचा कि माझ्यासाठी प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ काढून ठेवला जायचा आणि कधी कधी तर ते मला जास्तीचे दुसऱ्या दिवशी खायला गोड पदार्थ बांधून द्यायचे. रात्री मला घेऊन जायला आणि सोडायला गाडी यायची.

वय लहान होते म्हणा किंवा काहीतरी करण्याचा ध्यास होता म्हणा. मला आता आठवत नाही कि मी कधी काही विपरीत घडेल म्हणून घाबरले असेन त्यावेळी. आणि हो कुणीही माझ्याशी वाईट वागले नाही. चांगली माणसे भेटत गेली.

मुलगा झाला. मी नोकरी सोडली होती . घरीच होते . आता माझा दिवस पूर्ण त्याच्याभोवती बांधलेला. नवराही त्याच्या कामात. माझा मुलगा संध्याकाळी ७ वाजता झोपी जायचा. त्यानंतर मग मला वेळ असायचा. आता बाहेर जायचा आणि गाण्याचे कार्यक्रम करायचा प्रश्नच नव्हता.

मध्ये कधीतरी माझ्या घर मालकिणीने मला मराठीतून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायला काही दिले होते. ते मी करून दिले होते. माझी घर मालकीण एका GENERAL इन्शुरन्स कंपनी मध्ये होती तर त्यांच्याकडे ट्रक च्या ACCIDENT केसेस चे FIR रिपोर्ट्स यायचे तर त्यातले महाराष्ट्रातले किंवा मराठी जाणणारे ड्राइवर मराठीतून FIR लिहायचे. तर मी एक दोनदा तिला ते ट्रान्सलेट करून दिले होते. तर हे डोक्यात चमकताच मी तिला जाऊन काम मागितले. आणि ती हि तयार झाली. मला मोबदला किती मिळत होता हे महत्वाचे नाही पण मला काहीतरी करायला मिळाले होते हाच मला आनंद होता .

मी आठवड्यात चार ते पाच FIR ट्रान्सलटे करून द्यायचे . कधी कधी मला त्यांच्या ऑफिस मध्ये पण जावे लागायचे दुभाषी म्हणून. कानडी आणि मराठी ड्रायव्हर्स ह्याचे ऐकून इंग्लिश आणि तामिळ मध्ये मी भाषांतर करायचे. ते ड्राइवर माझ्याशी खूप आपुलकीने वागायचे. मी त्यांची मदत करते आहे ह्या अनोळखी प्रदेशात ह्या भावनेने गहिवरून जायचे.

त्यांच्या आयुष्यातले दुःखही काहीजण माझ्यापुढे बोलून गेले. माझे वय आणि माझे अनुभव ह्यात फार तफावत होती त्या वेळी असे मला वाटते. जेमतेम २२ ते २३ माझे वय असेल त्यावेळी आणि अनेक पावसाळे बघितलेल्या , आयुष्याने सुरकुतलेल्या आणि कष्टाने रापलेल्या माणसाचे मनोगत शांतपणे ऐकून घ्यायचे आणि त्याला धीर द्यायचे. मलाच आश्चर्य वाटते कधी कधी.

खूप काही शिकायला मिळाले मला ह्या सगळ्यात. मी मराठी भाषेत शाळा शिकले त्यामुळे इंग्रजी बोलायचा सराव फार नव्हता पण आता मद्रास मध्ये मी सहा महिन्यात घसघशीत इंग्लिश बोलायला शिकले. चुकले मी खूपदा , लोक हसले खूप माझ्यावर पण प्रयत्न सोडला नाही. आणि माझ्या मुलाला शिकवताना इंग्रजी अजून अजून पक्की होत गेली.

इंग्लिश काय तामिळसुद्धा मी आजही व्यवस्थित बोलते. नवीन भाषा आणि नवीन माणसांशी जुळवून घेताना आपण बऱ्याच जुन्या गोष्टी टाकून देतो आणि नवीन आत्मसात करतो हे लक्षात आले.

माझा जॉब ITC मध्ये होता. एक वेगळेच कॉर्पोरेट वातावरण होते तिथे. माझे बॉस AKC  अनिल कुमार चौधरी ह्यांनी मला अगदी नीट शेक हॅन्ड शिकवण्यापासून सुरवात केली होती. त्यांनी मला फॉर्मल लेटर कसे लिहायचे ते शिकवले.

ताज हॉटेल मध्ये इतके प्रेम आणि मान मिळाला कि मला सोडून जाताना रडू आले. त्या वेळी घरी फोन नव्हता माझ्या पण त्यांचे ग्रीटिंग कार्ड माझ्या प्रत्येक वाढदिवसाला घरी आले.

आणखी एक महत्वाची गोष्ट मिळवली मी, ती म्हणजे अनोळखी प्रदेशात आत्मविश्वास. आता मला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आनंदी जगण्याची आणि माणसांना जोडण्याची गुरुकिल्ली मिळाली होती आणि माझ्या डोळ्यात वाढलेली चमक.

अर्थात पुढे काय लिहून ठेवले आहे हे मला माहित नव्हते पण ह्या एवढ्या अनुभवावर मी निश्चिन्त होते आता. माझा मुलगा साधारण दीड वर्षाचा असताना आम्ही ठाण्याला परत आलो.

आता सुरु झाला भाग २ माझी सुलूगिरी चा.

क्रमशः

This article has been contributed by muziclub principal Shruti Jakati.