माझी सुलूगिरी – भाग ५

साल २०११ ऑगस्ट
तर आता मी माझ्या नवीन आवाजाची सवय करून घेत , नव्याने स्वतःची ओळख बनवण्याच्या धडपडीत होते.
अनेक प्रश्न समोर होते कि मला कुणीच गायची संधी दिली नाही तर ? मी आता काय करायचे ? कि मी शेवटपर्यंत आता संस्कृत आणि संगीताच्या शिकवण्या घेत दिवस घालवायचे ?
सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार डोक्यात यायचे. पण एक संस्कार जो माझ्यावर लहानपणापासून नकळत झाला होता तो म्हणजे कधीही मला हे जमणार नाही किंवा हे होणार नाही असे नाही म्हणायचे. कायम हे होईलच असेच म्हणत आपले प्रयत्न चालू ठेवायचे. इति माझी मम्मी माझी आई. तिला मी कधी आजपर्यंत निराश झालेली बघितलेली नाही.
आम्ही तीन भावंडे. आमचे बालपण साधेच पण बऱ्याच खाचखळग्यांनी भरलेले होते. परिस्थिती खूप वेळा वाईट किंवा आमच्या हाताबाहेर गेली पण आमच्या आईमुळे आम्ही कधीच भटकलो नाही. एक दिशा डोक्यात नक्की करून चालत राहिलो.
कधीच हार मानली नाही.
आणि हा संस्कार आताच्या ह्या परिस्थितीत मला तारून गेला. माझ्या घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे कधीच करू शकले नसते हे हि तितकेच खरे.
आणि अनेक ध्येयवेडी , काही नुसतीच वेडी , काही आनंदाचे डोही रममाण झालेली अशी माणसे भेटली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले.
तर आता परिस्थिती अशी होती कि
माझा मुलगा आता हॉस्टेलला गेला होता आणि नवरा त्याच वर्षी देशाबाहेर एका नवीन देशात कामावर रुजू झाला होता.
आता मी एकटीच होते पुण्यात. खऱ्या अर्थाने मोकळी झाले होते. माझ्या संगीत आणि संस्कृत शिकवण्या चालू होत्या.
ह्याच दरम्यान मी मराठी चित्रपट "शाळा " ह्या चित्रपटाच्या संगीत निर्मिती मध्ये थोडा हातभार लावला होता. सुरवातीला मराठी गाणी लिहिली गेली होती. मी दोन गाणी लिहिली होती. एक तर केतकी माटेगावकर हिच्या आवाजात ध्वनिमुद्रित पण झाले होते पण नंतर दिग्दर्शकाला हिंदी गाणी हवी असे कळले त्यामुळे सगळे बारगळले. असो हा नकारात्मक अनुभव खूप काही शिकवून गेला.
सगळीकडे प्रयत्न करून नकार ऐकून झाले होते. खूप गाणी लिहून चाल लावून झाली होती. आता आपणच आपले एखादे गाणे रिलीज करावे असा विचार करून एक प्रयत्न करावा म्हणून माझ्या ओळखीच्यातल्या एका संगीतकाराला मुंबईला भेटले. त्याने मागितले तेव्हडे पैसे कबुल करून मी scratch रेकॉर्डिंग करून आले. दोनदा मुंबईला चकरा मारल्या. पण त्याने पुढे काहीच केले नाही. नंतर माझे फोन पण घेणे बंद केले. पुन्हा एकदा नकार.
एकीकडे माझा रियाझ चालू होताच. मध्ये कधीतरी अशोक पत्की ह्यांच्या कार्यशाळेची जाहिरात बघितली आणि त्यात नाव नोंदवले. खूप काही शिकायला मिळाले त्यात. पत्की सरांनी आमची गाणी बसवून गाऊन घेतली आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येकीचा आवाज जवळून ऐकला. ह्या कार्यशाळेनंतर काही निवडक लोकांना ते व्यक्तिगत मार्गदर्शन करायला तयार झाले आणि माझे त्यांच्याकडे शिकणे सुरु झाले. हा एक फारच सुखद अनुभव होता. त्यांच्यासारख्या दिग्गजाचे मार्गदर्शन मिळणे हे खूप आनंदाचे होते.
दिवस जात होते पण मी बेचैन होते. मला गायचे होते. मला कुठेच ती संधी मिळत नव्हती.
एक अशी जागा जिथे कुणीही येऊन गाऊ शकतो किंवा एखादे वाद्य वाजवू शकतो. जिथे त्याच्या चुकांवर कुणीही हसणार नाही. जिथे त्याला कुणीही त्याचे चांगले किंवा वाईट असे मोजमाप करणार नाही.
एक अशी जागा जिथे कुठल्याही वयाचा कलाकार , शिकलेला असो किंवा नसो , येऊन आपली कला विना संकोच सादर करू शकतो अशी जागा. जिथे त्याला अगदी आपल्या घरात बसून गातो आहोत असे वाटेल अशी जागा. जिथे त्याचा त्याच्या कलेच्या सादरीकरणाचा सर्व करता येईल आणि झालेल्या चुकांमधून शिकता येईल अशी जागा .
अशी जागा का नाही आहे आसपास ? माझ्या प्रश्नाला उत्तर नव्हते .
आता मी फेसबुक वर बरीच व्यस्त झाले होते. जुने मित्र मैत्रिणी भेटत होते.

एक दिवस मी फेसबुक वर muziclub चा फोटो पहिला आणि त्यांच्या पेजवर जाऊन नंबर मिळवला. हे नक्की काय आहे माहित नव्हते. तर फोन लावल्यावर तिथे कुणीतरी सांगितले कि हि एक music इन्स्टिटयूट आहे आणि सध्या रिनोवेशन चालू आहे. तुम्ही जुलै मध्ये फोन करून या.
तर जुलै मध्ये मी एका जुन्या हिंदी गाण्याच्या कराओके कार्यक्रमाची जाहिरात बघितली. "भुले बिसरे गीत" जो कार्यक्रम muziclub मध्ये रविवारी होता. मी गेले तिथे आणि दोन गाणी गायले. माझी दोन गाणी झाल्यावर मी बसले होते तर तिथला एक शिक्षक माझ्या जवळ येऊन माझी चौकशी करू लागला. त्याचे नाव देवव्रत राणा. त्याने पुढच्या रविवारी येणार का विचारले ? मी सहज हो म्हटले. तर त्याने मला दोन गाणी दिली आणि ह्याची प्रॅक्टिस करून ये म्हणाला.
पुढच्या रविवारी मी आणि देव ने मिळून ती दोन गाणीसादर केली. मी गायले आणि त्याने ड्रम वाजवला. एक गाणे मी माझे गायले. जाणा जोगी दे नाल . माझे गाणे संपल्यावर मी माझ्या खुर्चीवर येऊन बसले तर मला एका उंच गोऱ्या मुलाने आत बोलावले आणि विचारले कि तुम्ही muziclub मध्ये शिकवणार का ? अर्थात मी हो म्हटले .
त्या व्यक्तीचे नाव मोहम्मद मुनीम.
सुरवातीला मी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये शिकवायला जायचे. हे सगळे माझ्यासाठी नवीन होते. पण थोड्या दिवसात मी शिकले सगळे. नंतर मी muziclub मध्येहि शिकवायला सुरवात केली.
हार्दिक मुनीम मी आणि सुमना आम्ही शिकवण्याव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बघत होतो. आता इथे माझ्या कॉर्पोरेट नोकरीचा , माझ्या सायकॉलॉजि शिकण्याचा , इव्हेंट मॅनॅजमेण्ट शिकण्याचा फायदा झाला मला. कुठलेही शिक्षण वाया जात नाही हेच खरे. मी हळू हळू नव्हे तर झपाट्याने सगळ्या गोष्टी शिकत गेले आणि सगळ्या जवाबदाऱ्या मन लावून पार पाडत गेले आणि कधी मी ह्या सगळ्याचा एक मालकी हक्काने भागीदार झाले कळलेच नाही.
हा प्रवास सोपा नव्हता. मी कधीही असे काम केले नव्हते पण जशी जवाबदारी येत होती तशी ती मी निभावत गेले असे म्हणा. पण ह्या मागे Muziclub माझे आहे हि भावना नेहमी वरचढ ठरली म्हणूनच हे झाले.
एखाद्या कामाचे जो पर्यंत तुम्ही पालकत्व पत्करत नाही तो पर्यंत ते काम शंभर टक्के झाल्याचे समाधान कुणालाच मिळत नाही.
अर्थात ह्या सगळ्यात माझ्या सहकार्यांनी माझ्यावर केलेले प्रेम आणि टाकलेला विश्वास खूप महत्वाचा.
आणि हा असा बऱ्याच दिवसांनी मला मिळालेला एक आश्वासक आणि सकारात्मक अनुभव मला सुखावून गेला.
दर रविवारी आमच्या इथे म्हणजे Muziclub मध्ये "संडे जॅम " मी गाऊ लागले. जी हक्काची जागा मी शोधात होते ती मला इथे मिळाली स्वतःला अजमावून घेता येणारी अशी जागा
आणखी काय हवाय मला ? असा प्रश्न मी आता स्वतःला विचारू लागले होते. मी खूप खुश होते.
माझ्यासारखीच वेडी माणसे भेटली . जीवाचे मैत्र भेटले. दिवस कसा जात होता हे हि कळत नव्हते . घरी कुणीच माझी वाट बघणारे नसल्याने मी हि सतत इथेच पडीक असायचे.

असे अनेक दिवस म्हणजे साधारण दोन वर्षे गेली. आता जुन्याच स्वप्नांना नवीन पंख फुटत होते.
आता मला माझ्या गाण्यांना लोकांसमोर आणायचे होते. माझ्या आवाजालाही आता माझ्या गुरुजींमुळे छान आकार आला होता.
माझा हा आवाजही आता मला आवडू लागला होता आणि लोकांच्याही पसंतीस मी उतरते आहे ह्याचे समाधान होते.
तर मला असे वाटले कि आता इतकी लोकं आपल्याला नव्या आवाजात ओळखू लागले आहेत. कुणीतरी मला एखाद्या कार्यक्रमात गाण्याची संधी देईल . पण तसे कधी झाले नाही. आणि मी दोषही कुणाला दिला नाही कारण इथे सर्वांना जवळून बघून कळले कि हि सगळ्यांची स्वतंत्र लढाई आहे.
प्रत्येक जण इथे struggle करतो आहे. इथे सगळे मित्र मैत्रिणी आहेत पण जेव्हा तुमच्या व्यवसायाची बात येते तेव्हा कोणीही कुणाचे नाही. हा माझा मार्ग एकला.
बरं आणि मला प्रसिद्धी पैशापेक्षाहि गाणे महत्वाचे होते जे मी संडे जॅम मध्ये गातच होते.
तेव्हा मी नवोदित कलाकारांना घेऊन आपली गाणी करण्याचे ठरवले आणि २०१३ साली संकेत साने बरोबर एक गाणे रिलीज केले. पदराचे पैसे घालून आम्हा कलाकारांना आमची गाणी श्रोत्यांपर्यंत पोचवावी लागतात. तेच केले.
गाणे सर्वांना खूप आवडले . मला अजून हुरूप आला . आणि आता मी माझे स्वतः लिहिलेले , स्वतः संगीतबद्ध केलेली गाणी एक एक करून रिलीज करायचे ठरवले.
प्रत्येक गाण्याची एक आपली कहाणी आहे. कधी कधी पंधरा दिवसात एखादे गाणे बनून तयार होते आणि कधी कधी एक वर्षं सुध्दा लागते तर कधी ते गाणे बनून तयार होऊन सुद्धा काही तांत्रिक कारणांनी पडून आहेत.
तर हा एक माझा मार्ग आता मी आखला होता तरी स्टेज वर एखाद्या बँड मध्ये गाण्यासाठी मी मनोमन झुरत होते.
खूप वर्षांची सवय म्हणा किंवा हि एक आग आहे ज्याला इंग्रजी मध्ये Fire In the Belly म्हणतात हि सतत कलाकाराला छळत राहते .
सतत दाखवत राहते … ते बघ ते करायचे आहे तुला , ते हवे आहे तुला.
तर ह्या सगळ्या मध्ये , सगळे असतानाही मला ती स्टेज वरची गायिकेची जागा खुणावत राहिली.

तशी एक संधी अपघाताने माझ्याकडे चालून आली. हार्दिक आणि मुनीम ह्यांचा एक बँड होता " Highway ६१ " त्यांचे कार्यक्रम होत असायचे . अर्थात त्यांच्याकडे बघून मलाही वाटायचे कि मी कधी गाणार अशी वगैरे. तर २०१४ मध्ये त्यांना एका स्पर्धेत भाग घ्यायचा होता अतिशय प्रतिष्ठित अश्या कोक स्टुडिओ ह्या कार्यक्रमात विजेत्याला संधी मिळणार होती.
त्यांच्या कडे एक गायिका होती निराली पांचाल जिने एक त्यांचे गाणे ध्वनिमुद्रित पण केले होते. ती सुट्टीवर तिच्या घरी गुजरातला गेली होती. तिला त्यांनी स्पर्धेबद्दल सांगितले आणि तिला यायला सांगितले. नेमके एक आठवडा असताना तिच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याने ती येणार नाही असे कळले .
मग हार्दिक आणि मुनीम ने शेवटचा पर्याय म्हणून मला विचारले. अर्थात मी हो म्हटले.
गाणे आमचे आम्ही लिहून संगीतबद्ध करायचे होते आणि दिवस होते फक्त सात. आम्ही दोन दिवसात दिवस रात्र बसून ते गाणे बनवले आणि प्रॅक्टिसला सुरवात केली.
गाण्याचे नाव साहीबो . ज्यात आम्ही संत कबीर, अल्लामा इक्बाल आणि एक काश्मिरी प्रार्थना ह्यांचा सुंदर गोफ विणला होता. आम्ही शेवटच्या फेरी पर्यंत गेलो , जिंकलो नाही. पण ह्या अनुभवाने माझ्यासाठी अनेक दारे उघडली. ह्या गाण्याचे दुर्दैव असे कि हे आम्ही एका हिंदी चित्रपटासाठी ध्वनिमुद्रितही केलं पण चित्रपट सेन्सॉर च्या कात्रीत अडकला आणि प्रदर्शित झालाच नाही.
ह्या सगळ्यात एक सत्य कळले " तुम्ही जेव्हा तयार असता तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोचतेच …. लवकर नाही कि उशिरा नाही.
आता हळूहळू मी त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यक्रमात गाऊ लागले. मी दोन किंवा तीनच गाणी गायचे. माझ्या गाण्यांची वेळ येईपर्यंत शांतपणे प्रेक्षकात बसून राहायचे.
दोन किंवा तीनच गाणी?
हो ती कधीच त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. मी बऱ्याचदा सांगितले पण तसे घडले नाही कारण पुन्हा तेच हि प्रत्येकाची लढाई. इथे प्रत्येकाला जिंकायचे आहे. दुसरा आपल्यापेक्षा वरचढ ठरणार नाही ह्याची वेळोवेळी खबरदारी घेतली जाते.
हे असे नवीन नवीन प्रकार माझ्या लक्षात यायला लागले होते. पण मी जुन्या वळणाची, जुन्या संस्कारांची.
गाणे एक तर एक, ते असे गायचे खणखणीत कि कार्यक्रम संपल्यावर लोकांना बाकीची पन्नास गाणी सोडून आपलेच लक्षात राहणार . आम्ही गाण्यातूनच सिद्ध करणार स्वतःला, राजकारण करून नव्हे.
तर अश्या प्रकारे जेव्हा माझ्या वयाच्या इतर मैत्रिणी midlife क्रायसिस मध्ये झगडत होत्या तर मी माझ्या स्वतंत्र अस्तित्वाच्या वाटा शोधत माझ्याहून १२ ते १५ वर्षे तरुण लोकांच्यात हिरीरीने गात होते.
कधीतरी मध्ये एकदा माझा मित्र अविनाश चंद्रचूड ह्याच्याशी कार्यक्रम संदर्भात बोलताना तो एक वाक्य म्हणाला " एक गाणे असो तीन गाणी असोत ह्या कार्यक्रमांचा तू उपयोग करून घे तुझा स्टेज वरचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. कार्यक्रमाच्या आधीचा nervousness किंवा anxiety हळूहळू शून्य करून टाक , आणि कार्यक्रम झाल्यानंतर लवकरात लवकर नॉर्मल लेवल ला येण्याची प्रॅक्टिस कर.
इतका लाख मोलाचा सल्ला देणाऱ्या माझ्या मित्राचे आभार आणि मी स्वतःला भाग्यवान समजते अश्या मित्रामुळे.
त्याने म्हटले तसेच केले मी. गायचे तर खणखणीतच पण ह्या बाकीच्या गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या असतात प्रत्येक कलाकाराला कि ज्यामुळे आमचे पाय कायम जमिनीवर राहतात त्याही हळूहळू आत्मसात केल्या.
खूप कार्यक्रम केले , दौरे केले . इतके बरे वाईट अनुभव घेतले कि मला असे वाटले कि माझ्यासाठी हि एक अतिशय उत्तम कार्यशाळा ठरली.
कार्यक्रम वाढायला लागले आणि Muziclub मध्ये मी नसल्याने बऱ्याच गोष्टी अडत होत्या म्हणून मनात कुठलीही कटुता ना ठेवता मी त्या बॅंड मधून बाहेर पडले. ते साल होते २०१७
ह्या सगळ्या २०११ ते २०१६ मध्ये muziclub मध्ये आम्ही तिघांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. अनेक नामवंत कलाकाराच्या कार्यशाळा , आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इतरत्र गाण्याची आणि वाजवण्याची संधी उपलब्ध करून दिली. आमचा वार्षिक समारोह हा एक उल्लेखनीय कार्यक्रम असतो. तर हा व्याप आता इतका वाढायला लागला होता कि माझ्यासाठी हि तारेवरची कसरत ठरत होती.

Muziclub , माझा बँड , माझी वैयक्तिक गाणी हि तिहेरी भूमिका निभावताना मी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बँड सोडून दिला.
तर आता पर्यंत मी माझी एक गाणे रिलीज केले होते " एक जिंदगी "
हे गाणे मी दुबई मध्ये असताना लिहिले होते आणि चाल लावली होती. इथे ते दोन तीन माझ्या ओळखीच्या arrangers ना दिले होते पण कुणी काहीच केले नाही. म्हणून मग मी Muziclub मधल्याच माझ्या सहकाऱ्यांना घेऊन हे गाणे बनवले. विडिओ मध्ये पण Muziclub आहेच. गाणे खूप काही चित्रपटाच्या तोडीचे नाही आहे पण मला आवडले आणि ते आजही माझ्या कार्यक्रमात मी गाते. हे माझे स्वतः लिहिलेले संगीतबद्ध केलेले पहिले गीत म्हणून पण माझे आवडते आहे.
१९९९ – लिहिले संगीतबद्ध केले
२०११ ते २०१६ अनेक प्रयत्न केले आणि शेवटी २०१६ मध्ये एकदाचे रिलीज झाले
बघितले ना तुम्ही कि किती सहनशक्ती असावी लागते कलाकारांना. लांबून किती ग्लॅमरस वाटते आमचे जग. सतत प्रसिद्धीचा झोत, लोकांची वाहवा , सुंदर सुंदर फोटो ( अर्थात जाणून बुजून वाईट फोटो कुणीही टाकत नाहीच )
आमच्याकडे बघून लोकांना वाटते काय जगते आहे आहे हि.
एका अर्थाने खरेही आहे कि आम्ही जगतो कारण इथे कुणीही आवड किंवा ध्यास नसेल तर टिकत नाही. त्यामुळे जे टिकतात ते वेडेच असतात. त्यांना ह्या व्यतिरिक्त काहीही करायचे नसते म्हणूनच ते ह्या क्षेत्रात असतात मग कितीही वाईट अनुभव येवोत. आमच्यासाठी आमुची कला , आमचे वेड आणि ध्यास हेच अखेरचे सत्य असते जे कधीच आम्हाला नाउमेद करत नाही.
This article has been contributed by muziclub principal Shruti Jakati.