माझी सुलूगिरी … भाग ४दुबई वरून डायरेक्ट पुण्यालाच का? मुंबईला का नाही ? ठाण्यात घर आहे ना तुमचं ?

अचानक असा कसा निर्णय घेतला? एकदम !??

एवढी चांगली मोठ्या पगाराची नोकरी सोडून आणि चांगले गाण्यात बस्तान बसले असताना कशाला हि अवदसा सुचली तुला ?

अनेक प्रश्न विचारले गेले मला. पण मी कुणालाही काहीही उत्तर दिले नाही . मला माहित होते मी का  परत जाते आहे.

"Destiny is the push of our instincts to the pull of our purpose."  अर्थात आज हे मी म्हणू शकते तेव्हा मी हि थोडी आशंक होते माझ्या निर्णयाबाबत.

मी ३० डिसेंबर २००२ दिवशी माझ्या प्रॉक्टर अँड गॅम्बल ह्या कंपनीच्या कामाचा राजीनामा दिला आणि मार्च मध्ये पुण्यात येऊन माझ्या मुलाची शाळेत ऍडमिशन घेतली आणि एप्रिल मध्ये माझ्या नवीन घरी राहायला पण आले.

काहीही अचानक नाही ठरले. खरे तर खूप कारणे होती ज्यामुळे मी हा निर्णय घेतला.

खूप महत्वाचे कारण होते माझ्या मुलाचे शिक्षण. एकंदर दुबई मधल्या शिक्षणावर आम्ही दोघेही खुश नव्हतो. आणि इतर ज्या अमेरिकन आणि ब्रिटिश शाळा होत्या त्या आमच्या ऐपतीच्या बाहेर होत्या. आणि एक कारण म्हणजे एकंदर सुखासीन आयुष्याला माझा मुलगा सरावाला होता आणि मी पण . तेच नको होते मला.

माझी नोकरी तर मी अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे तर फक्त पैशासाठी करत होते. रोज सकाळी गाडी चालू करताना मी हा प्रश्न स्वतःला विचारायचे कि का करते आहेस तू हे काम जर तुला आवडत नाही तर ? उत्तर एकच होते " पैसा ".

त्यातपण आता मन रमत नव्हते. कारण मला कळून चुकले होते मी ह्या अश्या कामासाठी नाही बनलेले.

मला माणसांच्यात माणसांशी संबंधित काम जास्त आवडायचे. भाषा , मानसशास्त्र , संगीत हे विषय मला अतिशय आवडतात ह्याची जाणीव झाली होती तीव्रतेने.

आणखी एक कारण होते कि जवळ जवळ सात वर्षे मी गात होते. सगळी हिंदी किंवा मराठी गाणी , जी आधी कुणीतरी म्हंटली आहेत तीच गाणी तशीच त्यांच्यासारखी म्हणायची , तशीच हरकत सगळे तसेच गाण्यात आता मला आनंद मिळेनासा झाला होता. किती वर्षे गायचे तेच तेच. हे सगळे तर त्या गायक गायिकांच्या स्मरणात त्याच अनुभवासाठी मला ऐकतात. मी कुठे आहे ह्या सगळ्यात ?

हि गाणी ह्या त्यांच्या भावनांचे सादरीकरण , माझ्या भावनांचे किंवा माझ्या शब्दांचे काय? , माझ्या स्वभावाच्या आणि आवाजाच्या अनुषंगाने येणाऱ्या हरकतींचे काय ?

मला माझ्या आवाजात माझी गाणी गायची ओढ लागली होती. मला माझे संगीत हाक मारू लागले होते.

आणि मला अगदी लहानपणापासूनच लोकसंगीत हेच जास्त आवडते. त्यात आता सुफी आणि भक्ती संगीताची भर पडली होती.

दुबई मध्ये आबिदाजी , गुलाम अली जी , वडाली बंधू ह्या सर्वांना ऐकून तर मला खात्री पटली कि मला हेच आवडते कारण माझ्या मनात ते गाणे सारखे घुमत राहिले , आणि दर वेळी ऐकताना रोमांच आणि डोळ्यात पाणी येतच राहिले. कदाचित हा एक नवीन प्रकार मी ऐकला म्हणून मला आवडले असेही असेल पण शास्त्रीय संगीतात सुद्धा मला भक्ती रस जास्त भावला लहानपणापासून.

आणि एकदा एका प्रसंगामुळे मला असे वाटले कि मी हि इतरांसारखी आपले स्थान टिकवण्यासाठी कुठलीही पायरी गाठू शकते कि काय ? मी अगदी तिथपर्यंत जाऊन स्वतःला जाणीवपूर्वक मागे खेचले होते. हे माझ्यासाठी माझे अधःपतन होते. मी स्वार्थी होत चालले होते आणि मी माझ्याच नजरेतून उतरू लागले होते.

गाणे शिकणे पण माझे मागेच पडले होते. माझे संगीत कुठेतरी अडकून पडले होते , मी पुढे जात नव्हते.

ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला कि मी राजीनामा देऊन भारतात परत आले.

 

 

आता पुण्यातच का ? तर माझा जन्म पुण्याचा आणि मला पुणे आवडते. मुंबई मध्ये मी वाढले पण ते शहर कधी आपले वाटलेच नाही. मी हि एक गर्दीतली बनून जाईन ह्याची भीती वाटते मला अजून तिथे गेले कि.

आणखी एक कारण म्हणजे  मला पंख्याची ऍलर्जी असल्याने मुंबई मध्ये मी सारखी आजारी पडते आणि त्या शहरात आणि दुबई मध्ये मला फारसा फरक वाटला नाही. फक्त स्वतः मध्येच  व्यस्त असलेले शहर मला पचनी पडत नाही हेच खरे.

तर अशी मी आणखीन एका नवीन गावात , नवीन घरात आणि नवीन दिनक्रमात रुजू झाले होते.

सर्वात प्रथम मी श्रीमती शोभाताई अभ्यंकर ह्यांच्याकडे संगीत शिक्षण सुरु केले. मग तीन चार महिने आराम केला . माझ्या मुलाबरोबर मस्त वेळ जात होता.

खूप वर्षांनी पावसाळा अनुभवाला आणि मनाला पटले कि मी योग्य केले. मी माझ्या संवेदना पणाला लावून जगत होते तिथे. माझे सारे ऋतू तर इथे आहेत ह्या माझ्या देशात. सारे ऋतू माझ्या घरात आतपर्यंत आलेले मला खूप आवडतात . बंद घर मला अजिबात आवडत नाही. दुबई मध्ये नऊ महिने उन्हामुळे सतत घरे बंद करून एअर कंडिशनर लावावा लागायचा .माझ्या घराच्या गॅलरीमध्ये झोपाळा हि माझी आवडती जागा झाली होती.

माझे लिखाणहि जोरात चालू झाले. मी राहते ती सोसायटीसुद्धा नवीन होती. सगळे एकाचवेळी इथे राहायला आलो. नवीन मैत्रिणी मिळाल्या. पहिला गणपती उत्सव सोसायटीचा खूप छान साजरा झाला. मी हि गायले. दिवस अगदी मस्त चालले होते.

आता मी माझी गाणी  लिहून चाल लावून घरातच गाऊ लागले.

पुण्यात आल्यावर एक ठरवले होते कि दोन तीन वर्षे गाण्याचे व्यावसायिक कार्यक्रम करायचे नाहीत.  मला काय काय शिकायचे आहे किंवा माझ्या मुलाचा दिनक्रम सांभाळून काय काय करता येईल ? ह्याची यादी मी करून  ठेवली होती.

माझ्या मुलाला पाचवीपासून म्हणजे आम्ही आलो त्या वर्षांपासून संस्कृत होते. आणि मलाही हि भाषा अगदी मनापासून शिकायची होती. म्हणून मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा संस्कृत विशारद एक्सटर्नल ला प्रवेश घेतला.

त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये मी एक जाहिरात बघितली  मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज मध्ये इव्हेंट मॅनॅजमेन्ट चा एक वर्षाचा कोर्स होता. संध्याकाळी एक दोन तास क्लास असायचे. माझ्या मुलाच्या संध्याकाळी खेळायच्या वेळात मी जाऊन यायचे. मी सगळे काही त्याच्या अनुषंगाने करत होते.

ह्या कोर्समध्ये सुरुवातीला ओळख करून देताना मी माझी ओळख एक गायिका म्हणून करून दिली. तर ह्या इन्स्टिटयूट ची संचालिका मयुरीने एका अल्बम साठी माझे नाव सुचवले तिच्या ओळखीच्या संगीतकाराला.

काम पुण्यातच होते. स्टुडिओ होता Music Byte आणि ती व्यक्ती होती श्री रवी वेदांत . मी डिसेम्बर मध्ये त्या अल्बमची गाणी गायली सगळी. माझा सहगायक प्रशांत नासेरी होता.

अमेरिकेत स्थायिक असलेले फार मोठे उद्योगपती माननीय श्री सुहास पाटील ह्यांच्या मुलाच्या लग्नासाठी हा अल्बम बनवला गेला होता. श्रीमती पाटील ह्यांनीच हि गाणी लिहिली होती आणि चाल लावली होती.

ह्या अल्बमच्या टीम मध्ये अविनाश चंद्रचुडची ओळख झाली. एक फार चांगला मित्र मिळवला मी. तेव्हा तो अजून पुण्यात होता अजून मुंबईला गेला नव्हता तेव्हाची २००३ ची गोष्ट. मग मी त्या स्टुडिओ मध्ये बरीच जिंगल्स गायले. गाणी गायले. ज्ञानेश्वरी गायले हा त्यातला फार मोठा आनंदाचा भाग.

आणि खूप काही शिकले जे अनमोल आहे. मी तिथे ऑडिओ इंजिनीरिंग चा कोर्स केला. गायकासाठी जे जे अत्यंत गरजेचे आहे ते सगळे शिकले. खूप तांत्रिक बाबी शिकले ज्या मला अजिबात माहित नव्हत्या.

२००४ हे असे सगळे नवीन नवीन शिकण्यात जात होते. त्या वर्षी मी खूप साऱ्या इव्हेंट्स मध्ये इंटर्न म्हणून काम केले. पिफ म्हणजे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि अनेक संगीत कार्यक्रमात आता मी कलाकार म्हणून नव्हे तर संयोजक ह्या भूमिकेतून काम करत होते.

माझा इव्हेंट मॅनॅजमेन्ट कोर्स संपायच्या आधीच मी कौस्तुभ ढवळे उर्फ कोको (अग्नी फेम ) ह्याच्या Fine Arts Production ह्या इव्हेंट कंपनी मध्ये पार्टटाइम काम करू लागले होते. पुन्हा तेच माझ्या मुलाची शाळेतून यायची वेळ झाली कि परत जायचे घरी.

ह्याच दरम्यान मी वारली आणि मधुबनी चित्रकला शिकले. रंग-चित्रकला हि मला लहानपणापासून आवडते. आता खऱ्या अर्थाने शिकत होते. मी miniature मुघल पैंटिंग्स पण शिकले.

खूप वर्षांनी मला असे मनासारखे करायला मिळत होते. जेवढे शक्य होते तेवढे मी शिकत होते. मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटत होते.

Grant A Smile आणि  Make a wish foundations ह्या दोन्ही संस्थांसाठी अनेक इव्हेंट्स केले. पुण्यातल्या जुळ्यांचा एक कार्यक्रम केला. पत्रकार नगर मध्ये श्री मिलिंद साठे ह्यांची दर्पण आर्ट गॅलरी आहे. त्यांच्या इथली पेंटिंग्स ची प्रदर्शनं भरवली. अनेक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले.

 

 

पुण्यात तेव्हा रेडिओ मिरची हे FM चॅनेल होते. २००५ मध्ये त्यांना एक वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी एक स्पर्धा ठेवली होती. मी अजिबात ह्या दोन वर्षात आपणहून काहीच गाण्याच्या क्षेत्रात प्रयत्न केला नव्हता किंवा मनातही नव्हते काही. त्या स्पर्धेचे नाव होते " माईक का लाल ". माझ्या एका मित्राने माझे गाणे त्यांना पाठवून दिले परस्पर आणि मला चक्क पहिले पारितोषिक मिळाले.

आणि बक्षीस काय तर मुंबई ला जाऊन नीरज श्रीधर म्हणजे " बॉम्बे विकिंग्स " फेम . तो बराच फेमस झाला होता तेव्हा . छोड दो आंचल हे त्यांनी rearrange केले होते आणि खूप प्रसिध्ध झाले होते. तर जे नशिबात असते ते चुकत नाही. मी मुंबईला जाऊन गाणे रेकॉर्ड केले त्याच्याबरोबर. ते गाणे म्हणजे रेडिओ मिरची ची anniversary गाणे होते. ते स्लोगन जिंगल म्हणून वापरले गेले.

२००५ मध्ये एक अतिशय महत्वाची अशी माझ्या आयुष्यातली घटना घडली . कधीतरी एकदा रेकॉर्डिंगच्या वेळी माझे आणि अविनाश चंद्रचूड ह्याचे बोलणे चालू होते गायकीवरून. मला आजकाल थोडा माझ्या आवाजात फरक जाणवत होता ते मी त्याला सांगितले. तो म्हणाला कदाचित तुझी गाण्याची किंवा रियाजाची पद्धत चुकत असेल. तू माझे गुरु आहे Dr. दिग्विजय वैद्य ह्यांच्याकडे जा. ते एकच आहेत जे तुला काय बरोबर ते सांगू शकतील. आणि मी वैद्य सरांकडे जाऊ लागले .

फक्त संगीत शिकायला नव्हे संगीत हि भाषा शिकायला. थोडक्यात असे कि मला संगीत ह्या भाषेत फक्त छोटे छोटे शब्द बनवता येत होते आत्तापर्यंत. सरांनी माझी शब्दसंपत्ती इतकी वाढवली. इतके विचार दिले , नजर दिली कि हे एका अथांग सागरासारखे वाटू लागले. किती घेऊ आणि किती नको असे झाले. किती तरी वेळा मी सर शिकवताना गायचे त्यात इतकी गुंग होऊन जायचे कि मला त्यांचे गाऊन झाल्यावर गायचे आहे ह्याचा विसर पडायचा.

सरांमुळे मला दिशा मिळाली. मला इतके दिवस काय हवे होते ते कळत नव्हते. पण आता कळले होते. मी स्वतःला शोधत होते. आणि मी मला मिळाले होते. मला माझे गाणे मिळाले होते. आता ते सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे नेते आहे अजून. हे सगळे योगायोग , दैवी ह्या शब्दांच्या पलीकडचे आहे. गुरु आणि भक्ती हे शब्द एकात एक मिसळूनच भेटू शकतात. दुसरी शक्यता नाही.

आता माझे संस्कृत आणि इव्हेंट मॅनॅजमेन्ट झाले होते आणि काही इव्हेंट्स मी करत होते घर सांभाळून. आता मी पियानो शिकायला लागले आणि  तीन वर्षात ४ grades ABRSM London च्या पास झाले. घरी पियानो पण आला.

आता मी घरी गाण्याचे क्लास सुरु केले. शनिवार रविवार.

बाकी दिवशी संस्कृत आणि हिंदी शिकवायला लागले. माझ्या मुलाचे मित्र आधी सुरवातीला यायचे नंतर मग हळू हळू विध्यार्थी वाढत गेले.

मला शिकवणे अतिशय सहज येते हे लक्षात आले. लहान लहान मुलांना शिकवताना माझ्या मनात psychology शिकायचे मनात येऊ लागले. आणि मी एक वर्षात behaviourial Psychology चा कोर्स केला. आणि बाणेर मध्ये संस्कृती शाळेत counsellor म्हणून जाऊ लागले. अनेक गोष्टी एका वेळी करणे हा अगदी डाव्या हाताचा मळ आहे हे  तुमच्या एव्हाना लक्षात आलेच असेल.

आणि हो आता माझ्या दिनक्रमात जिम ची भर पडली होती बरं का? माझे चालणे आणि व्यायाम , घराशी निगडित सगळ्या गोष्टी आणि घरी येणार जाणारे पै पाहुणे , नातेवाईक वगैरे सगळे चालूच होते.

आता हे सगळे वाचताना तुम्हाला वाटले असेल ना कि मी किती दिशाहीन झाले म्हणून ? कधी हे तर कधी ते , किती चंचलपणा ?

पण तसे नव्हते. मला खरेच ह्या गोष्टी शिकण्याची प्रचंड ओढ होती आणि हे सगळे जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. विश्वास ठेवा मी येणार आहे त्या मुद्द्याकडे. डेस्टिनी प्रारब्ध ह्यावर बऱ्याच जणांचा विश्वास नसतो पण माझा आहे.

 

 

तर हे सगळे पुन्हा पाचव्या गियर मध्ये चालू असताना एक दिवस मला माझ्या गळ्यात सूज आल्यासारखी वाटली. दुखत नव्हते म्हणून मी पण दुर्लक्ष केले. पण काही महिन्यात माझ्या लक्षात आले कि आजकाल सर्दी खोकला झाला कि मला खूप त्रास व्हायचा . लवकर बरे वाटायचे नाही. आणि रियाझ करताना आवाज थकू लागला होता. पुण्याची हवा थंड आणि कोरडी म्हणून मी दुर्लक्ष केले. पण गळ्यावर कसलातरी ताण जाणवत होता. म्हणून मग एक दिवस मी डॉक्टर कडे गेले. तर सगळ्या टेस्ट करून कळले कि गाठ आहे vocal chords च्या जवळ. operation करावे लागेल . आणि operation केल्यावर आवाज बदलू शकतो . तोच आवाज राहणार नाही. डॉक्टरांनी अगदी सहज सांगितले.

हे असे का व्हावे मला ?  माझा आवाज म्हणजेच मी . तोच जर राहणार नसेल तर मी गाणार कशी? आणि गाण्यांशिवाय मी ? हि कल्पना मला फार दुखी करून गेली.

पण दुःख मला फार तर एखादा दिवस त्रास देते नंतर मी त्या दुःखांशी समझोता करून स्वीकारून टाकते आणि पुढे काय करायला हवे हयाचा विचार करते . हे तंत्र मी माझ्या लहानपणीच रुजवले आहे स्वतः मध्ये .

"जे आहे तसे"असे म्हणत मी त्याचा स्वीकार केला आणि माझ्या मुलाच्या दहावी नंतर operation करायचे ठरवले. कारण जर malignancy निघाली तर पुन्हा पुढच्या उपचारांमुळे त्याच्या अभ्यासावर आणि त्याच्यावर त्याचा परिणाम नको व्हायला.

तर मी असेच गळ्यात दिवसेंदिवस मोठी होणारी गाठ घेऊन ८ महिने काढले आणि एक दिवस oepration पण झाले.

आता होती खरी परीक्षा. रिपोर्ट्स ची वाट बघताना तीन दिवस माझी काय अवस्था होती हे मलाच माहित. पण रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला. पण नाही इतक्या सहज नियती मला सोडणार नव्हती. माझी लढाई खरे तर पुढे होती. आठ दिवस झाले तरी माझा बोलतानाचा आवाज नीट होत नव्हता. खुपसा घोगरा , फुटलेला असा अनोळखी आवाज होता तो .

माझा बोलतानाचा आवाज नीट होईल  म्हणत मी पंधरा वीस दिवस काढले पण आता लक्षात आले होते कि हे असेच राहणार बहुधा.

गाणे तर दूरच आता मला माझा बोलतानाचा आवाजही नीट ओळखू येत नव्हता.

सत्वपरीक्षाच होती ती. मी किती जिद्दी आहे हे आता मला स्वतःलाच सिद्ध करायचे होते. माझ्या सरांनी माझ्यावर खूप मेहनत घ्यायला सुरवात केली. मी अगदी सकाळी त्यांच्याकडे ते कामावर जायच्या आधी रियाजाला जायचे. नित्य नेमाने रियाझ करू लागले. आवाज अजून पकडीत येत नव्हता. पण करत राहिले. कधी वाटायचे जमले आता गायला तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाहिल्यासारखेच व्हायचे. आवाज स्थिर होत नव्हता. ध किंवा शुद्ध धैवताच्या पुढे आवाज किरकिरा होत होता. तीन पट्टी आवाज खाली आला होता. गळ्यावर नव्याने संस्कार करावे लागणार होते. इतकी वर्षे मी गात होते ते जणू होत्याचे नव्हते झाले होते.

खूप निराशा मनात साठत होती पण सरांच्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा पुन्हा निराशा झटकून त्यांनी सांगितलेले करत राहिले. अगदीच नाही पण मी आठ नऊ महिन्यात गाऊ लागले बऱ्यापैकी. अर्थात पूर्वीच्या आवाज नव्हता पण गात होते हे हि कमी नव्हते.

ह्या दरम्यान operation च्या नंतर एक वर्षांनी मी जयदीप ढमढेरे ह्याला एका माझ्या मित्रामुळे भेटले. त्याच्या एका गज़ल च्या कार्यक्रमात त्याने मला गायची संधी दिली. मंजुश्री ओक हि मुख्य गायिका होती. माझी गाणी कशी झाली मला माहित नाही पण मला परत जयदीप ने कधी कुठल्याच कार्यक्रमाला बोलावले नाही कि त्यानंतर कधी त्याच्याशी बोलणेही झाले नाही ह्यातच मला कळले कि मला माझी स्वतःची वाट बनवावी लागणार.

ज्या ज्या लोकांकडे काम मागितले त्यांनी सगळ्यांनी एकच उत्तर दिले " तुला अमुक अमुक गायिकेसारखी तमुक तमुक ( म्हणजे ठराविक चित्रपटातली अथवा आधी कुणीतरी गायलेली ) गाणी म्हणता येतात का ? मग मी म्हणायचे " नाही " . कि पुढचे संभाषणच कधी घडले नाही.

आठ वर्षांपूर्वी मी पुण्यात अजून काही वर्षे गायचे नाही थोडा आराम करून, पुढे शिकून मग सुरवात करू असे ठरवून आले होते आणि हा दिवस होता जिथे मी गाण्यासाठी धडपडत होते , कासावीस झाले होते कि कधी एकदा लोकांसमोर गाईन .

आयुष्यातल्या ह्या घटनेने मला पुन्हा सापशिडी सारखे सापाच्या तोंडी देऊन पुन्हा सुरवातीला आणून ठेवले होते. आता पुन्हा नव्याने ओळख बनवायची होती माझ्या नव्या आवाजाची आणि मी पुन्हा नव्याने वयाच्या ४१ व्या वर्षी सेकंड इंनिंग सुरु केली होती.

वाटले होते हा शेवटचा भाग असेल पण अजून सात वर्षांची माझी सुलूगिरी बाकी आहे तेव्हा पुढचा भाग शेवटचा. एकदम १००% शेवटचा .

 

 


This article has been contributed by muziclub Principal – Shruti Jakati.