माझी सुलूगिरी …. भाग ३ 

अंताक्षरी ! अंताक्षरी ! असे मनात घोकतच मी दुबईला पोचले.

परत एक नवीन देश , नवीन घर , नवीन वातावरण आणि नवीन दिनक्रम  . मी आता अगदी पटाईत नाही पण बरीच रुळले होते " चार दिवसात घर लावणे " ह्या प्रकाराला. त्यात भर म्हणजे माझा उपद्व्यापी मुलगा.

त्याच्या शाळेची ऍडमिशन झाली. आम्ही राहायला शारजाह मध्ये होतो. शाळा ऑगस्ट मध्ये सुरु पण झाली.

आता पुन्हा नव्याने संधी शोधणे. पहिले मी काय केले असेल तर डिरेक्टरी मध्ये झी अरेबियाचा पत्ता  आणि फोन शोधून काढला . आणि एकदा फोन पण केला. पण कुणी उचलला नाही.

शेजारी एक बंगाली कुटुंब होते. तशी अर्धी दुबई भारतीय लोकांनी भरलेली होती. त्यात मल्याळी ९०%.

इथे आल्यावर पहिली ओळख माझ्या शेजारच्या डे कुटुंबाशी झाली. त्यांनी मला महाराष्ट्र मंडळाचा फोन नंबर दिला.

पण जाणार कसे ? इथे तुमच्याकडे गाडी नसेल किंवा गाडी चालवता येत नसेल तर तुम्ही अपंग आणि लाचार असता. आणि टॅक्सी खूप महाग पगाराच्या मानाने. तेव्हा मी काही करू शकत नव्हते.  मनातून जबरदस्त गाण्याची ओढ होती पण काहीही उपाय दिसत नव्हता. बरोबर आणलेल्या काही कॅसेट्स , दोन रेडिओ चॅनेल आणि एक टीव्ही चॅनेल एवढेच काय ते होते सोबत.

दुबईत  त्यावेळी बांधकामांची तेजी होती. आम्ही शुक्रवारी माझ्या नवऱ्याच्या कंपनीच्या गाडीने (कंपनीचा ड्राइवर ) दुबईला किंवा आसपास जायचो. सगळीकडे बांधकाम चालू होते. चकचकीत मोठमोठे मॉल हा प्रकार मी इथे पहिल्यांदा बघितला .

एक ठाण्यातले ठक्करचे जांभळी वरचे दुकान आणि मद्रास मध्ये आम्ही राहायचो तिथले पुष्पा शॉप्पी म्हणजेच मॉल अशी समजूत असलेली मी दुबईत येऊन हरखून गेले. मॉल हि एक सुट्टीच्या दिवशी फिरायला जायची जागा झाली. मी खरेदीत बरीच वाहवत गेले सुरवातीला.

असो तर दुबई मध्ये तेव्हा दोन रेडिओ चॅनेल्स होती आणि त्यातले एक शारजाह मध्ये होते. सध्या रेडिओ हाच माझा मोठा आधार होता कारण अजून इथे आम्ही सगळी टीव्ही चॅनेल्स म्हणजे केबल घेतली नव्हती. एक फुकट येणारे चॅनेल होते चॅनेल ३३ ज्यावर दर शुक्रवारी हिंदी चित्रपट लागायचा.

मला कुठेतरी लांब वाळवंटात पाण्यावाचून तडफडत असल्याचा फील यायचा कधी कधी. माझ्यासाठी काहीच नव्हते इथे. मी नेलेल्या कॅसेट्स किती ऐकणार ? त्यामुळे माझा पूर्ण दिवस त्या  एक रेडिओ शारजाह आणि त्यावर लागणारे मल्याळी हिंदी आणि उर्दू असे कार्यक्रम असायचे त्यावर भागायचा. एक झी अंताक्षरी च्या आशेवर मी दिवस काढत होते.

 

 

 

एक दिवस रेडिओ वरचा माणूस कुठल्यातरी competition बद्दल बोलत होता. ते चॅनेल आता FM होणार होते आणि त्याला नाव काय द्यायचे ? ह्यासाठी ती स्पर्धा होती. काय बक्षीस होते आठवत नाही पण त्याचे नाव सात दिवसात HUM FM ठेवले गेले. Hindi Urdu Malyali म्हणून.

आता बरेच नवीन कार्यक्रम त्या चॅनेल वर सुरु होणार होते त्यात एक होता अंताक्षरी. हे कळल्यावर मी घरात नाचून घेतले. मला काहीतरी करायला मिळणार होते ह्यातच मी खुश होते. तुम्ही म्हणाल कि काय कॉन्फिडन्स आहे. नुसता कार्यक्रम जाहीर झाला आहे अजून सुरु पण नाही झाला आणि हिला अगदी जिंकल्याचा आनंद झाला . पण खरे सांगते मला कधीच कुठेही जिंकण्यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी जायचेच नव्हते किंवा गायचे नव्हते. माझ्यासाठी गाणे हे अगदी बोलण्यासारखे सहज आहे. तर मी अगदी चातकासारखी वाट बघत होते कार्यक्रम सुरु व्हायची.

कार्यक्रमात तुम्ही घरूनच फोनवर गायचे होते आणि जिंकणाऱ्याला काहीतरी मिळणार होते. मी पहिल्या फेरीत फोन लावला पण लागलाच नाही. खूप जण असणार माझ्यासारखे अर्थात. तर तिसऱ्यावेळी माझा नंबर लागला आणि मी जिंकलेच. खूप भारी वाटले मला त्यादिवशी.

त्यांचा फोन आला म्हणाले तुम्ही येऊन भेटता का ? मला वाटले बक्षीस घ्यायला बोलावत असतील. मी रेडिओ स्टेशन ला जायच्या कल्पनेने इतकी खुश झाले कि मी घरातल्या slipper घालूनच गेले टॅक्सी ने. ( तेव्हा शारजाहमध्ये कुठेही ५ दिरहम लागायचे टॅक्सी ला ) शोधत शोधत गेले. दारातच मोठा बोर्ड होता HUM FM शामल मीडिया सर्विसेस .

आत गेल्यावर मला एक अतिशय लयबद्ध हिंदी उर्दू मिश्रित बोलणारी बाईने ( फरहत सुलतान )  बसवले आणि सांगितले कि माझा आवाज त्यांना आवडला आहे. एक जिंगल गायची आहे तर तुम्ही गाल का ?

मी ह्याची अपेक्षाच करत नव्हते , मी आलेले बक्षीस घ्यायला आणि इथे मला बंपर जॅकपॉट लागला होता. मी हो म्हटले अर्थात.

रेकॉर्डिंग रूम मध्ये एक तरुण काहीतरी काम करत होता कॉम्पुटर वर. त्याची माझी ओळख करून दिली फरहत सुलतान ह्यांनी. फरहत  सुलतान ज्या तिथल्या सर्वे सर्वा होत्या. सुनील जाधव असे त्या तरुणाचे नाव होते. तो ठाण्याचाच होता. हा अजून सुखद धक्का होता. मी ती जिंगल जसे सांगितले तसे गायले. जाताना सुनील ने सांगितले कि एक गाणे रेडिओ वर रेकॉर्ड करायची संधी आहे. तू गाणी ठरव आपण दिवस ठरवू रेकॉर्डिंगचा. त्यावेळी लोकल लोकांमधल्या कलाकारांना वाव देण्यासाठी हा अजून एक कार्यक्रम होता.

त्या वेळी फक्त नाचायचेच बाकी होते माझे. पण मी संयम ठेवला. पण मी एकदम छप्पर फाड के खुश होते.

रेडिओच्या ऑफिस मधून बाहेर पडल्यावर मला माझ्या चपला दिसेनात. खूप शोधल्या. तिथे चप्पल कधीच चोरीला गेल्या नव्हत्या असे तिथला watchman सारखा सांगत होता . पण मला तर माझ्या चपला  मिळाल्याचं नाहीत. मी तशीच अनवाणी घरी आले आणि घरी येऊन बघते तर चपला घरी होत्या आणि माझ्या घरातल्या slippers  तिथेच राहिल्या. झाले असे कि मी माझ्या घरातल्या slipper माझ्या म्हणून ओळखलंच नाही बाहेरच्या चपलांचे जोड शोधत राहिले. असो तर असा माझ्यासाठी तो चमत्कारी दिवस होता.

मला गायला यायचे बोलावणे आले. मी दोन गाणी निवडली होती . क्यूँ जिंदगी कि राह मी मजबूर हो गाये आणि मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ . मी क्यूँ जिंदगी कि राह मे हे गाणे रेकॉर्ड केले. फार सुंदर ट्रॅक बनवला होता सुनील ने. त्याच्याकडून मी खूप काही शिकले. रेकॉर्डिंग तंत्र , उच्चार , जाहिरातींमध्ये गाण्याची पद्धत , गाणे लवकरात लवकर आत्मसात करण्याची टेक्निक . त्यानंतर मी बऱ्याच जिंगल्स गायले . फ्री लान्सर म्हणून काम करू लागले. फार काही रोजचे काम नव्हते पण जे होते त्यात मी खुश होते.

अरे हो सांगायला विसरले कि ह्या दरम्यान माझे झी अरेबियाला फोन चालूच होते. एक दिवस कुणीतरी उचलला आणि म्हटले कि हो अंताक्षरी टीम जानेवारी मध्ये  येणार आहे.

दिल है छोटासा …. छोटीसी आशा !!!!!

 

 

ह्याच दरम्यान मी पेपर मध्ये सतत काहीतरी मला जमेल असे घराच्या जवळपास काही काम मिळते का हे बघत होते. पार्ट टाइम. ऑक्टोबर मध्ये करामा दुबई मध्ये एका orchestra साठी गायक गायिका हव्या होत्या आणि ऑडिशन होत्या. मी म्हटले जाऊन तर बघूया. गेले ऑडिशन दिली . गायले " दम मारो दम " आणि तिथल्यातिथे निवड झाली.

तो ग्रुप चालवणारा माणूस म्हणजे बद्रुद्दीन हा रेडिओ Asia वर काम करत होता. त्यामुळे त्या रेडिओवर पण मी अधून मधून जिंगल्स गाऊ लागले माझ्याबरोबर गोव्याचा शकील अहमद म्हणून पण एका गायकाची निवड झाली. तो हि शारजाह मध्ये राहायचा. आम्ही एकत्रच रिहर्सल आणि कार्यक्रमाला जायचो. माझी यायची जायची सोय झाली होती पण शकीलच्या प्रोत्साहनामुळे ड्रायविंग शिकायचेच हे मी ठरवले.

कार्यक्रम महिन्यातून दोन असणार होते.आणि रिहर्सल कार्यक्रमाच्या आधी दोन वेळा .

बाकीचा वेळ मी आता गाण्याचे क्लास घ्यायला सुरवात केली होती . दोन जणी यायच्या आठवड्यातून दोनदा.

माझ्या शेजारणीकडून मला महाराष्ट्र मंडळाचे गदगकर ह्यांचा नंबर मिळाला. त्यांच्याशी बोलणे झाले. फोनवरच मी त्यांना केदार राग गाऊन ऐकवला. त्यांचा एक ग्रुप होता "सूर हिंडोल" जो दर महिन्याला  एका रागावर आधारित गाणी सादर करायचा. मी हि त्यात गाऊ लागले.

त्या ग्रुप मधल्याच जयश्री करी ह्या खूपच कार्यरत होत्या दुबई संगीतक्षेत्रात. त्यांच्यामुळे मला इंडियन कॉन्सुलेटच्या कार्यक्रमात गायची संधी मिळाली. अर्थात महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमात मी गायले.

आणि एक फार मजेशीर काम करायचे मी. माझ्या मुलाचा एक खास मित्र झाला होता मोवीन म्हणून. तर संध्याकाळी कधी तो आमच्याघरी तर कधी माझा मुलगा त्याच्या घरी खेळायला जायचे. त्या मुलाची आत्या ग्रेस आणि माझी छान मैत्री झाली होती. तिला मी सांगितले कि मला काहीही कुठे काम मिळाले तर सांग.

तर एक दिवस तिचा घरी फोन आला कि एक काम आहे सहा महिन्यासाठी . काम असे कि एक प्रॉडक्ट सर्वे आणि रिसर्च कंपनी मध्ये त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती घेऊन , वापरून त्याच्यावर आपले मत लिहून द्यायचे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची जी ते रेकॉर्ड करून घ्यायचे .आणि मोबदला काय ? यायचा जायचा खर्च. कधी घड्याळ , कधी मोत्याचा सेट , कधी चाकूचा सेट , कधी बेडशीट तर कधी perfume, कधी स्वयंपाकाचे तेल वगैरे .

मी लगेच हो म्हटले. घरी बसून डोके खराब करण्यापेक्षा चार लोकांना भेटणे , संभाषण चातुर्य न्याहाळणे आणि शिकणे ,स्वतःला सतत कशात तरी  गुंतवून ठेवणे हा माझा छंद मला तिथेच गवसला . मला माणसे न्याहाळायची आवड तेव्हाच कधीतरी लागली.

मी ह्या प्रॉडक्ट रिसर्च कंपनी मध्ये फेमस झाले कारण मी जाईन तिथे मी गाते असे सांगायचे. त्यामुळे मी उत्सव मूर्ती असायचे कायम.

मी सहा महिने नाही चांगली चार वर्षे हे काम केले माझ्या सोयीने.

बाजारात यायच्या आधी प्रॉडक्ट्स च्या ट्रायल होतात. त्यात मी असंख्य कॉस्मेटिकस, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि खाण्याचे पदार्थ ( हवाबंद चिप्स, बिस्किटे, केक्स इत्यादी ) वापरून ह्यावर आपले मत द्यायचे.

आता माझ्या जवळच्या लोकांना कळेल कि बाजारात नवीन वस्तू किंवा एखादा खाण्याचा पदार्थ आला कि का मी तो वापरून बघतेच. मुख्यतः माझी मैत्रीण सविता आणि माझी बहीण सुवर्ण ह्या नेहमी मला विचारतात तुला कश्या दिसतात ह्या वस्तू आम्हाला का दिसत नाहीत ? मला कुठल्याही प्रॉडक्ट वर काय माहिती असते आणि त्याचा अर्थ काय हे नीट माहित असते कारण माझे ट्रैनिंग तसे झाले आहे. त्या दोघी मी सांगितलेले प्रॉडक्ट डोळे झाकून वापरतात.

 

 

तर असे सगळे माझे "मी डोलकर डोलकर" चाललेले असताना आली एकदाची माझी झी ची अंताक्षरी टीम. मी ऑडिशन मध्ये सिलेक्ट झाले माझ्या बरोबर प्रसन्न म्हणून {मुंबईचाच } साथीदार होता. Al Ain मध्यल्या वॉटर पार्क मध्ये ह्याचे शूटिंग झाले. अन्नू कपूर आणि पल्लवी जोशी. आम्ही सेमी फायनल मध्ये हरलो. दोन एपिसोड जिंकलो. खूप मजा आली. खूप ओळखी झाल्या. मला अजून कार्यक्रम मिळत गेले.

मागचे दोन्ही भाग वाचल्यावर माझी आत्येबहीण जी डॅलस मध्ये राहते भाग्यश्री , तिने एक छान वाक्य बोलता बोलता म्हटले कि " Luck is when opportunity meets preparation. "  मी वर म्हटले तसे कि मला पैशासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी गायचे नव्हते तर चार लोकांसमोर गायची संधी कायम हवी असायची आणि आजही असेच आहे.

तर संधी कधीही येऊ शकते आणि त्यासाठी मी रोज ना चुकता माझा रियाझ आणि माझा चालण्याचा आणि व्यायामाचा रिवाज कधीही सोडला नाही. मी कधीही केव्हाही गाण्यासाठी तयार असायचे आणि असते. मी नवीन नवीन गाण्याचे प्रकार किंवा genre म्हणू आपण , ते ऐकत असते. वेगवेगळ्या कलाकारांना बघत , ऐकत मी नवीन नवीन शिकत राहिले आहे.

दुबई मध्ये सुरुवातीला कुणीही गुरु नव्हता पण जे आजपर्यंत शिकले होते ते अजमावण्याचा काळ होता तो. मी माझा रस्ता शोधत राहिले सतत. दुबई मध्ये माझे हिंदी उर्दू उच्चार अजून शुद्ध केले मी.

खूप वेळा आयुष्यात असे क्षण आले कि असे वाटले कि मी इथून पुढे जाऊ शकणार नाही कदाचित , किंवा माझा निभाव नाही लागणार , माझ्याकडे इथे टिकून राहण्यासाठी जी मानसिकता लागते ती नाही असे एक नाही हजार विचार मनात येऊन जायचे पण मी हार नाही मानली , जे जसे मिळेल तसे गात राहिले ,

खूप पुस्तकं वाचत राहिले . हो वाचन . वाचनाने मला खूप काही दिले. आणि लिहू लागले , मी कॉलेज पासून लिहिते पण दुबईमधल्या वास्तव्यात माझे लिखाण वयात आले.

दुबई मध्ये कामवाली बाई नसते. सगळी कामे आपली आपणच करायची असतात. आणि खरे तर कामवाली बाई परवडणारे दिवस नव्हते ते. तेव्हा मीच कामवाली , आई , इस्त्रीवाला सगळे मीच. तरी कधी मी माझा रियाझ नाही चुकवला.

मला ड्रायविंग शिकायचे होते . माझ्या नवऱ्याला तीन वेळा प्रयत्न करून एकदाचे ड्रायविंग license मिळाले. घरी गाडी आली. मला घराच्या जवळच , चालत जायच्या अंतरावर एका ट्रेडिंग कंपनी मध्ये काम मिळाले पार्ट टाइम. रोज ३ तास काम असायचे .

आता मी ड्रायविंग शिकायला लागले होते. मी पण तीन वेळा नापास होऊन झाले एकदाची ड्राइवर. तोपर्यंत मला एका मोठया कंपनीमध्ये दुबई मध्ये नोकरी मिळाली होती. मी सुद्धा माझी नवीन गाडी घेतली.

 

 

दुबई मध्ये किंवा शारजाह मध्ये कारपूल खूप चालायचे. मी माझ्या ऑफिसच्या वाटेवर ते करायला सुरवात केली. पैसे लागतात जगायला आणि खूप पैसे लागतात स्वप्ने पुरी करायला हे आता इथल्या वास्तव्यात कळले होते. मी आता जमेल तसा पैसे कमावणे , जमेल तसा गाण्याचा अनुभव गोळा करणे  आणि प्रत्येक अनुभवातून शिकणे एवढेच ध्येय ठेवले होते.

आता माझी इतकी शारीरिक ओढाताण व्हायची कि विचारू नका पण मी गात राहिले.

माझा दिनक्रम असा होता

सकाळी

६. ३० – मुलाला डबा बांधून शाळेच्या बस मध्ये सोडणे

८. ०० – कपडे भांडी आणि दुपारचा स्वयंपाक करून ऑफिस साठी निघणे

९. ०० ते ५. ००  माझे ऑफिस – माझे काम अकाउंट्स आणि फिनान्स असिस्टंट

६. ००  घरी येऊन मुलाचा अभ्यास त्याचे जेवण खाण करून रिहर्सल किंवा कार्यक्रम ला जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे.

माझा नवरा सतत फिरतीवर असायचा त्यामुळे रिहर्सल किंवा कार्यक्रमाला माझा मुलगा कायम माझ्याबरोबर असायचा. मी त्याच्या परीक्षा असताना त्याचा तोंडी अभ्यास घेत घेत ड्राईव्ह करायचे.

ह्या सगळ्यात मी दोन वर्षे डॉलरेक्स ह्या कंपनीत पिरॅमिड नेटवर्किंग करून बरेच डॉलर्स कमावले.

मी दुबई वास्तव्यात अनेक जिंगल्स गायले अनेक कराओके कार्यक्रम केले. बऱ्याच मान्यवर कलाकारांबरोबर गायले.

जसे कि सलमान खान , अरबाज खान , मलाईका अरोरा , अमीर खान , सोनू निगम , शान , अभिजीत , जगजीत सिंग आणि बरेच पाकिस्तानी कलाकार सुद्धा.

जावेद अख्तरजी ह्यांनी त्यांच्या वडिलांचे एक पुस्तक " तर्कश " हे दुबई मध्ये प्रसिद्ध केले तेव्हा त्या कार्यक्रमात मी जावेद जीं ची गाणी म्हटली. एकदा रहमान ह्यांचा मल्याळी मासिक " मनोरमा " तर्फे एक खूपच खासगी कार्यक्रम होता. फक्त invitees होते. आयत्यावेळी त्यांच्या गायिकेला बरे नव्हते म्हणून माझी वर्णी लागली.

गाणे आता माझे सर्वार्थाने बहरत  होते . मी एकाच वेळी मराठी हिंदी तामिळ गाणी , कराओके , live , स्टुडिओ रेकॉर्डिंग , रेडिओ रेकॉर्डिंग सगळ्या क्षेत्रात गाण्याच्या विविध पद्धती मी आत्मसात करत होते .

मिलिंद चित्तल तेव्हा शारजाह मध्ये राहत. मी त्यांच्याकडे शिकायला जायला लागले.

 

 

हे सगळे सांगितले ते खूपच उत्साहवर्धक आणि छान असे आहे. पण ह्या सगळ्यात मी खूप अपमान सुद्धा सहन केले. नकार ऐकले. दुर्दैवी अश्या राजकारणाला बळी पडले. कधी रडले, कधी चिडले तर कधी मी आडमुठ्या लोकांबरोबर भांडले.

मला संगीत क्षेत्रातले राजकारण दुबई मध्ये नीट कळले. खरे तर परदेशात आपल्या देशाइतकी competition नसते. "वासरात लंगडी गाय शहाणी "ह्या तत्वावर त्यातल्या त्यात बऱ्या गाण्यार्या सगळ्यांना संधी होती किंवा असते. पण काही जणांचा हव्यास इतका मोठा असतो आणि तो हव्यास गाण्याचा नसतो तर प्रसिद्ध व्हायचा असतो हे हि लक्षात आले.

मी मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर गायले ह्याचे  कारण भारतातून दोन तीन गाण्यासाठी गायिका आणण्यापेक्षा इथल्याच बऱ्या गायिकेला त्यावेळी इव्हेंट वाले घेत असत. पण त्यातही इन मिन आम्ही चार जणींमध्येही राजकारण घडले. अर्थात मी कधीच कुणाशी संबंध बिघडवून घेतले नाहीत पण माझ्या स्पष्ट स्वभावामुळे बऱ्याच वेळा गैरसमजही झाले.

लंडन सा रे ग मा प मध्ये माझी अंताक्षरी नंतर लगेच निवड झाली. मला तसा फॅक्स आला. त्यावेळी फॅक्स आणि पेजर असायचे. खूप आनंद झाला. आम्ही व्हिसा ची प्रोसेस सुरु केली कारण फार दिवस नव्हते हातात.

खूप जणांना ह्या कार्यक्रमात भाग घ्यायचा होता आणि गजेंद्र सिंग च्या टीम वर तसा बरेच जण दबाव टाकत होते.

मी तर अगदी नवीन होते दुबई मध्ये . मला एक दिड वर्षच झाले होते येऊन. पण माझ्याआधी इथे बरेच वर्षे राहणारे आणि त्यांच्या ओळखी मोठ्या असल्याने माझा पत्ता कट करायच्या विचारात होते. मला जे काही घडत होते आजूबाजूला त्या वरून अंदाज आला होता. पण मी मागे हटणार नव्हते आपणहून.

माझा व्हिसा झाला आणि मी फोन करून तसे झी ला कळवले तर दुसऱ्या दिवशी माझे नाव कॅन्सल झाल्याचा मला फॅक्स आला. खूप वाईट वाटले मला पण मी काही करून शकत नव्हते. तसेही जे होते ते भल्यासाठी असे म्हणतच मी इथवर आले आहे. नंतर चार दिवसातच माझ्या मुलाला गोवर आले . तेव्हा जे झाले ते भल्यासाठीच.

तर अश्या पद्धतीने पाचव्या गियर मध्ये माझी सुलूगिरी दुबई मध्ये आठ वर्षे जोरात चालू होती. मी नोकऱ्या बदलल्या. घरे बदलली. जिवावरचे अपघात निभावून नेले. आजारपणं , सतत कुणी ना कुणी तरी नोकरी शोधायला किंवा दुबई बघायला येणाऱ्यांची सरबराई , सगळी सगळी दुनियादारी चालूच होती.

मी खरे तर माझ्या मुलाच्या शब्दात BURN-OUT मोड वर होते. खूप अनुभवांचे भांडार घेऊन आणि मी अगदी होत्याची नव्हती इतका माझ्या व्यक्तिमत्वात बदल आणि दुप्पट आत्मविश्वास घेऊन २००३ च्या एप्रिल मध्ये पुण्यात राहायला आले.

तर आता तुम्ही म्हणाल , आता पुण्यात आल्यावर काय नवीन होणार ? तेच सगळे जे आधी घडले आहे तेच , बरोबर आहे पण नाही तसे नाही आहे . picture अभी बाकी है , खरा ट्विस्ट माझ्या आयुष्यातला पुण्यातच आहे.

पण तो पुढच्या भागात, बहुधा पुढचा भाग शेवटचा.

 

 

 

 

Read PART 1 here: माझी सुलूगिरी …भाग १

Read PART 2 here: माझी सुलूगिरी … भाग २


This article has been contributed by Muziclub Principal Shruti Jakati.