माझी सुलूगिरी … भाग २" हॅलो "

" हॅलो " आपका स्वागत है। झी टीव्ही के ……  इस शो में।  आपका नाम?  ( शो चे नाव विसरले आहे .)

" मेरा नाम श्रुति है।  और मैं ठाणे में रहती हूँ। .

" श्रुति जी आप क्या करती है? "

" जी मैं एक हाउसवाइफ हूँ और मेरा दो साल का बेटा है। "

" और कौन कौन है आपके घर में ? "

" जी मैं , मेरे husband , मेरा बेटा और मेरी सासु जी। "

" चलिए श्रुति जी अब आ रहा है आपके लिए एक सवाल। जिसका जवाब अगर आप सही देते हो तो आपको मिलेगा एक गिफ्ट हमारे चैनल से।

" जी "

' तो आपका सवाल है के १९९४ में जो फिल्म आयी थी जिसका नाम था " हम आपके है कौन " इस फिल्म में माधुरी दीक्षित का नाम क्या है? "

" निशा "

congratulation श्रुति जी आप जीत गयी है और आपको मिला है …….  का एक खूबसूरत डबल बेडशीट।"

" थैंक यू। "

" आपको हमारी चैनल की तरफ से फोन आ जायेगा इस गिफ्ट के बारे में।  धन्यवाद कॉल के लिये।  "

मी वर काहीतरी बोलणार एवढ्यात त्या माणसाने फोन ठेवून दिला. खूप दिवसांनी मला काहीतरी आयुष्यात घडल्यासारखे वाटले. काहीतरी केल्यासारखे वाटले अगदी "तुम्हारी सुलु" सारखे.

 

 

मद्रास वरून ठाण्याला येऊन एक वर्ष कसे गेले कळले नाही. एकतर मी लग्नानंतर चार पाच वर्षे सासर (ठाणे ) आणि माहेर (डोंबिवली ) ह्यांच्यापासून दूर होते . आता जवळ आले म्हणून सासर माहेर दोन्हीकडून आनंद ओसंडत होता . त्यात आता माझा मुलगा म्हणजे कौतुक शिरोमणी.

त्यामुळे आल्यानंतर नवीन घर लावण्यात वेळ गेला . नंतर असंख्य नातेवाईक , सण , समारंभ , लग्न , बारशी , वाढदिवस, गणपती , दसरा , दिवाळी तसेच जवळच्या व्यक्तींचे जाणे , माझे मित्र मैत्रिणी ह्यांच्याशी पुनर्भेट ह्या सगळ्या कौतुक सोहळ्यात एक वर्ष कसे गेले कळलेच नाही .

तर सांगायचं मुद्दा असा कि मी अगदी घरगुती housewife झाले होते. आणि हा रोल मला आवडत नव्हता किंवा जबरदस्ती होती अशातला भाग नाही. मला कधीच माझ्या सासर माहेरच्या लोकांनी कुठलेच निर्बंध घातले नाहीत . मी पुरेपूर आनंदात होते. मला घर आणि घराशी निगडित सगळ्या गोष्टींत रस आहे अजूनही .फक्त आता मला कुठल्याही समारंभाला जाणे जमत नाही फारसे.

मी ठाण्याला आले तेव्हा माझ्या खास मैत्रिणींची अजून लग्न सुद्धा झाली नव्हती , त्या नोकरी करत खूप मजा करत होत्या. कधी सिनेमा , कधी पिकनिक तर कधी कुठल्या कार्यक्रमाला मला बोलवायच्या पण मी जाऊ शकत नव्हते कारण माझ्या मुलाला सोडून जाणे मला नको वाटत होते इतकी मी त्याच्यामाझ्या सोबत असण्याला सरावले होते. मी त्याला एक मिनिट सुद्धा कधी कुणाकडे सोडत नव्हते. माझी आई मला नेहमी म्हणायची कि तसे करू नकोस त्याला सोडत जा आमच्याकडे कधी कधी . नंतर जड जाईल. तिचे ऐकून मी त्याला कधी कधी शॉपिंगला जाताना किंवा मैत्रिणीकडे जाताना आईकडे सोडून जायचे पण माझे चित्त कायम त्याच्यापाशी असायचे. काय करत असेल ? लवकर जायला हवे असे कायम डोक्यात यायचे.

सांगायचा मुद्दा असा कि हे आईपण मी अगदी पुरेपूर अनुभवले. इतके कि मी स्वतःला विसरून गेले होते.

पण हळूहळू माझ्यातली " सुलु " जागी व्हायला लागली होती. आजूबाजूला अनेक बदल होत होते. टीव्ही वर नवीन नवीन private चॅनेल्स यायला लागली होती. संगीत क्षेत्रात चित्रपटाव्यतिरिक्त गाणारे बरेच जण प्रसिद्ध झाले होते. अल्बम हा एक नवीन प्रकार भलताच फॉर्मात होता. जुन्या चित्रपटातली गाणी नव्याने गाऊन सोनू निगम , शान वगैरे मंडळी , अन्नू कपूर आणि पल्लवी जोशी ची " Sansui अंताक्षरी " आणि सा  रे ग मा बघून माझ्यातली सुलु जरा जास्तच चळवळ करू लागली होती.

रेडिओ ऐकत मी मोठी झाले. लागलेले गाणे आता पुन्हा कधी लागेल माहित नाही असे असल्याने मी इतकी जीव लावून ती गाणी ऐकायचे कि एका फटक्यात चाल , शब्द सगळे लक्षात ठेवायची करामत आमची पिढी करू शकत होती. तेव्हा गाणी इतक्या सहज ऐकता येत नव्हती आजच्यासारखी. मी गाण्याचे शब्द , कवी कोण ? संगीतकार कोण? चित्रपटाचे नाव त्यात काम केलेल्या कलाकारांचे नाव ह्या सगळ्यात एक्स्पर्ट होते.

तर अंताक्षरी खेळून कुणी प्रसिद्ध होऊ शकते हि करामत गजेंद्र सिंगच करू जाणे. मी तर जीव लावला होता त्या शो वर. एकंदर टीव्ही ह्या प्रकारावर माझे आता प्रेम जडले होते म्हणा ना. झी "सा  रे ग  मा " पण सुरु होऊन एक वर्ष झाले होते .

 

 

तर मी शेवटी माझ्या "सुलु" चे ऐकून एका कार्यक्रमात फोन करून एक बेडशीट जिंकले होते. आता वाट बघत होते त्यांच्या फोन ची. रोज घरातून बाहेर जाताना असे वाटायचे कि मी नसताना त्यांचा फोन आला तर? माझ्या सासूबाईंना पण बजावून ठेवले होते , नीट लिहून घ्या पत्ता आणि नाव .

शेवटी एका महिन्यांनी त्यांचा फोन आला कि अंधेरीला येऊन तुमचे गिफ्ट घेऊन जा.

मी आणि माझा मुलगा आम्ही पोचलो झी टीव्ही च्या ऑफिसला. माझ्या मुलाला ट्रेन चे प्रचंड वेड होते त्यामुळे मी त्याला आईकडे ना सोडता बरोबर घेऊन गेले. तिथे पोचल्यावर त्यांनी नाव आणि पत्ता घेतला आणि बसायला सांगितले. बराच वेळ लागेल म्हणाले. तर मी तिथे आजूबाजूला लागलेल्या पोस्टर वर नजर फिरवत बसले होते. तर तिथे मला एक नोटीस दिसली. ज्यात अमुक अमुक दिवशी होणाऱ्या ऑडिशन साठी कोण कोण काम करणार ती लिस्ट होती. अर्थात त्यांची ती इंटर्नल नोटीस होती पण मला मिळाले होते जे हवे होते ते.

मी माझे गिफ्ट घेताना त्या माणसाला ऑडिशन बद्दल विचारले आणि त्याने मला सगळे डिटेल्स दिले. पुढच्या आठवड्यातच होती ऑडिशन दादर ला. घरी परत जाताना मला ट्रेन मध्ये पंख फुटल्यागत झाले होते. बऱ्याच वर्षांनी दारात उभे राहून वारा अंगावर घ्यावासा वाटत होता पण माझा मुलगा मांडीवर झोपला होता.

ऑडिशन झाली, माझी निवड झाली. शो चे नाव होते एल टीव्ही मस्त मस्त शो . गजेंद्र सिंग ह्यांचाच  कार्यक्रम होता .

कार्यक्रमाचा format असा होता कि ४ स्पर्धक , दोन टीम , एकमेकांना चित्रपटाचे नाव देणार आणि त्यांनी त्यातले एक गाणे गायचे . नाही गायले तर तो स्पर्धकआणि ती टीम बाद . मग दुसरा स्पर्धक येणार. अर्थात गाणे गायचे म्हणजे एक कडवे गायचे नीट. चित्रपटांची भली मोठी लिस्ट दिली होती सगळ्यांना.

ऑडिशन झाल्यावर मी स्टेशन ला परत जाताना त्यांच्या टीम चा एक मेंबर पण माझ्याबरोबर होता. त्याच्याशी बोलता बोलता मी माझ्याही नकळत त्याला म्हटले कि मला आवडेल तुमच्या टीम मध्ये काम करायला. तर तो म्हणाला आम्हाला पण हवीच आहेत माणसे ज्यांना चित्रपट संगीत आणि इतर संगीत प्रकारांची माहिती आहे. गायक असतील तर हवेच आहेत रिसर्च टीम मध्ये काम करायला. मी माझी काम करायची तयारी दाखवली. त्यांनी मला सांगितले कि तू प्रथम तुझा " मस्त मस्त शो " कर मग टीम जॉईन कर. कारण टीम मधल्या लोकांना सहभागी होता येत नसे. मी हो म्हटले.

त्या कार्यक्रमात शान अँकर होता .

ऑडिशन नंतर एका महिन्यानंतर रिहर्सल असणार होत्या. हे सगळे साधारण नोव्हेंबर १९९६ च्या शेवटच्या आठवड्यात घडले आणि डिसेम्बर मध्ये माझ्या नवऱ्याला दुबई मध्ये नोकरी लागली. तो जानेवारी मध्ये जाणार होता आणि आम्ही त्यानंतर सहा महिन्यांनी.

 

मला एकीकडे परदेशात जायचे म्हणून आनंद आणि दुसरीकडे झी टीव्ही अंताक्षरीच्या टीम मध्ये काम आता करता येणार नाही ह्याचे वाईट वाटत होते. तसे त्यांनी काही मला जॉब दिला नव्हता पण तो काळ असा होता जेव्हा शब्दाला किंमत होती ह्या क्षेत्रात. मी पहिल्या रिहर्सलला त्यांना सांगितले कि मला दुबई ला जावे लागणार आहे मी नाही काम करू शकत त्यांच्या टीम मध्ये . खूप वाईट वाटले मला पण इलाज नव्हता .

फेमस स्टुडिओ मध्ये शूटिंग होते . माझ्यासाठी सगळेच नवीन होते आणि मी शिकायला उत्सुक होते . सकाळपासून आम्ही शूटिंगची तयारी बघत होतो. टेक रिटेक , लाईट्स , कॅमेरा  सगळं सगळं नवीन होतं . अगदी मनापासून सांगते त्यादिवशी पहिल्यांदा मी विसरले मी कोण आहे , माझे लग्न झाले आहे , मुलगा घरी आहे , तो काय करत असेल . एका वेगळ्या दुनियेत मी होते . खूप मजा केली सगळ्यांनी. शान सतत हसतमुख चेहऱ्याने वावरायचा.

पहिले गाणे माझे रॉकी चित्रपटातले  "क्या यही प्यार है " हे होते आणि दुसऱ्या एपिसोड मध्ये पडोसन चित्रपटातले " शर्म आती है मगर "होते. ह्या शूटिंग च्या वेळी माझ्याबरोबर कुणीही नव्हते त्यामुळे माझ्याकडे त्याचा एकही फोटो नाही आहे. आणि रेकॉर्डिंग पण नाही.

मी दोन फेऱ्या पार केल्या तिसऱ्या फेरीच्या वेळी माझ्या बरोबर जी मुलगी होती ती आली नाही आणि आमचा एपिसोड कॅन्सल झाला आणि मी बाद झाले. दोन फेऱ्या जिंकल्याने मला खूप सारी बक्षिसे मिळाली. ७००० रुपयांचे अजंता घड्याळ कंपनीचे vouchers  , एक कुठल्या तरी (नीट आठवत नाही )  कपड्याच्या कंपनीची ५०००/- रुपयाची vouchers .

ती सगळी बक्षिसे आणायला मी ,माझा लेक आणि माझी आई आम्ही मोहम्मद अली रोड वर गेलो होतो. आणि तो एक किस्साच आहे. त्या दिवशी शिवसेनेने अचानक कसला तरी बंद पुकारला आणि आम्ही दुकानात अडकून होतो तीन तास . तसे अनेक किस्से आणि घटना आहेत ज्या स्वतंत्र लेखनाचा विषय आहेत. असो.

मी दुबईला जायला अजून एक महिना अवकाश होता. असेच मनात आले म्हणून मी फोन करून सगळ्यांना झी टीव्ही च्या ऑफिसला भेटायला गेले. तर त्या दिवशी तिथे अश्विनी करंदीकर पण होती. बोलता बोलता तिने म्हटले आम्ही लवकरच गल्फ अंताक्षरी करणार आहोत. तू कॉन्टॅक्ट मध्ये राहा.

 

बस्स . एवढेच हवे होते सुलूला. एका क्षणात सगळे छान वाटायला लागले. दुबई ला जायचा हुरूप अजून वाढला. फक्त जाताना माझा तानपुरा घेऊन जात येणार नाही म्हणून वाईट वाटत राहिले. दुबई वारीत केलेली सुलूगिरी आता पुढच्या भागात.

क्रमशः


This article has been contributed by muziclub principal Shruti Jakati.